paper leak

 

Tendernama

टेंडर न्यूज

अखेर शिक्कामोर्तब; विद्यार्थ्यांशी खेळणारी 'ती' कंपनी काळ्या यादीत

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : म्हाडा (MHADA) सरळसेवा भरती परीक्षेचे काम दिलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनेच पेपर फोडण्याचा कट रचल्याचे उघड होताच ऐनवेळी म्हाडाला परीक्षा रद्द करावी लागली. या प्रकरणाने उमेदवारांना त्रासाला सामोरे जावे लागले. तसेच म्हाडाची प्रतिमा डागाळली. या प्रकरणी म्हाडाने जीए सॉफ्टवेअर कंपनीने गोपनीयतेचा भंग केल्याने संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावावर राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या कंपनीविरोधात आवाज उठविण्यात आल्यानंतर सरकारने कारवाईचा बडगा उचलला आहे.

टेंडरनामाने अगदी सुरुवातीलाच "फेल कंपनीसोबत म्हाडाची परीक्षा" हे वृत्त देऊन जीए सॉफ्टवेअर कंपनीचा बोगसपणा उघड केला होता, अखेर म्हाडानेच त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध 14 संवर्गातील 565 रिक्त पदे भरण्यासाठी जीए सॉफ्टवेअर या कंपनीची निवड करण्यात आली होती. या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने गुप्ततेचा भंग करत पेपर फोडण्याचा कट रचल्याचे समोर येताच म्हाडाने ऐनवेळी परीक्षा रद्द केली. यामुळे परीक्षा केंद्रांवर पोहोचलेल्या उमेदवारांना त्रास सहन करावा लागला. तसेच म्हाडा प्रशासनाला बदनामी सहन करावी लागली.

राज्य सरकारने निवड केलेल्या कंपन्यांपैकी जीए सॉफ्टवेअर या कंपनीची म्हाडाने नेमणूक केली. परंतु कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच पेपर फोडण्याचा कट रचल्याने म्हाडाने या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार असल्याचे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.

कंपनीकडून शुल्क वसुली
म्हाडा भरती परीक्षेसाठी नेमणूक केलेल्या जीए सॉफ्टवेअर या कंपनीसोबट करार केला. करारानुसार म्हाडाने परीक्षेच्या कामासाठी 20 टक्के रक्कम कंपनीला दिली. मात्र कंपनीने गोपनीयतेचा भंग केल्याने म्हाडावर परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. यामुळे म्हाडा प्रशासनाने कंपनीला दिलेली २० टक्के रक्कम परत करण्यास सांगितले आहे. करारानुसार कंपनीकडून ही रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे, सूत्रांनी सांगितले.