New York Central Park News मुंबई : महालक्ष्मी येथील रेसकोर्सची (Mahalakshmi Race Course) 120 एकर जागा अखेर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ताब्यात आली आहे. या जागेवर आता मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्क, गार्डन आणि ओपन स्पेस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सची तब्बल 226 एकर जागा बिल्डर मित्राला जादा 'एफएसआय' देऊन घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप राज्य सरकारवर केला जात होता.
महालक्ष्मी रेसकोर्सच्या 211 एकर जागेपैकी 120 एकर भूखंडावर न्यूयॉर्क (अमेरिका), लंडन (यूके) येथील पार्कच्या धर्तीवर हा पार्क विकसित केला जाणार आहे.
दक्षिण मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेली महालक्ष्मी येथील रेसकोर्सची एकूण 211 एकर जमीन रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 1914 साली भाडे करारावर देण्यात आली. हा भाडे करार 2013 मध्ये संपुष्टात आला. यानंतर करार वाढवला नसल्याने ही मुदत संपल्यानंतर या जागेपैकी 120 एकर जागा राज्य सरकारमार्फत महापालिकेच्या ताब्यात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर उर्वरित 91 एकर जागा आरडब्ल्यूआयटीसीला भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे.
महालक्ष्मी रेसकोर्सची तब्बल 226 एकर जागा बिल्डर मित्राला जादा 'एफएसआय' देऊन घशात घालण्याचा डाव मुख्यमंत्र्यांकडून सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सुद्धा या प्रक्रियेला कडाडून विरोध केला होता.
मुंबईकरांना विश्वासात न घेता महापालिका आयुक्तांना हाताशी धरून आणि रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या काही सदस्यांना धमकावून, दबाव आणून महालक्ष्मी रेसकोर्स येथील मुंबईकरांच्या हक्काची शेकडो एकर मोकळी जागा 'बिल्डर-कंत्राटदार सरकार'च्या घशात घालण्यासाठी हा घोटाळा सुरू असल्याचे उघड झाल्याने मुंबईकरांमध्ये मोठा संताप व्यक्त होत होता.
महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पात तब्बल 175 एकर मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. या ठिकाणीदेखील गार्डनसाठी अद्ययावत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
डॉ. ऍनी बेझंट रोड येथून 25 मीटर रुंदीचा अंडरग्राऊंड मार्ग तयार करण्यात येणार आहे. हा मार्ग केकळ नागरिकांना ये-जा करण्यासाठी असेल. या मार्गावर वाहनांना प्रवेशास मनाई असणार आहे. त्यामुळे रेसकोर्सकरील 120 एकरचे 'मुंबई सेंट्रल पार्क' आणि कोस्टल रोडवरील 175 एकर जागेवरील ग्राऊंड जोडल्यावर एकूण 300 एकरचे ग्राऊंड मिळणार आहे.
रेसकोर्सची 120 एकर जागा महापालिकेच्या ताब्यात येणार आहे. राज्य सरकारच्या मंजुरीमुळे याबाबतची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आहे. या जागेवर मुंबईकरांसाठी नियोजित थीम पार्क, गार्डन, मोकळी जागा अशा सुविधा करता येतील.
– भूषण गगराणी, महानगरपालिका आयुक्त