L&T Tendernama
टेंडर न्यूज

L&T उभारणार BMCचा 'हा' तब्बल 2.5 हजार कोटींचा महत्त्वाचा प्रकल्प

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : वांद्रे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम मुंबई पालिकेने (BMC) लार्सन ॲण्ड टुब्रो कन्स्ट्रक्शन (L&T Construction) कंपनीला दिले आहे. हे काम अडीच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आहे. एलॲण्डटीतर्फे हा प्रकल्प उभारून तो कार्यान्वित करण्यात येणार आहे.

वांद्रे खाडीतून समुद्रात जाणाऱ्या मुंबईतील सांडपाण्यावर येथे प्रक्रिया करून ते पाणी शुद्ध करूनच समुद्रात सोडले जाईल. यामुळे समुद्रातील प्रदूषण कमी होईल व सागरी जीवसृष्टीची हानी होणार नाही, असा या प्रकल्पाच्या उभारणी मागील उद्देश आहे. येथे सौरऊर्जा प्रकल्पातून वीजनिर्मिती होईल. तसेच ३६० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होईल.

प्रकल्पाचा आराखडा तयार करून तो उभारून सुरू करून दिल्यावर त्याची काही काळ देखभालही कंपनीला करावी लागेल. त्याचबरोबर येथे प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार असून, तेथून समुद्राचे आणि समुद्रकिनाऱ्यावरील माहीम किल्ला, वांद्रे किल्ला येथपर्यंतच्या पट्ट्याचे मनमोहक दृष्य दिसेल. त्याचप्रमाणे येणाऱ्या नागरिकांना माहिती देण्यासाठी येथे एक ग्रंथालयही उभारले जाईल.