बंगळूर (Belagavi) : २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्याने वीज विक्रीतून दोन हजार ८३६ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केल्यामुळे कर्नाटकची ऊर्जा यशोगाथा देशात चर्चेत आली आहे. गेल्या वर्षीपर्यंत ऊर्जा क्षेत्र राज्यासाठी कर्जाचा डोंगर मानला जात होता. परंतु हरित ऊर्जेची मजबूत निर्मिती हे महसुलाचे फायदेशीर स्रोत बनले आहेत. कर्नाटकात ऊर्जा साठवण्यासाठी पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने राज्याकडे अतिरिक्त वीज विकण्याशिवाय पर्याय नाही. मात्र ही अडचण कर्नाटकच्या पथ्यावर पडली आहे.
गेल्या आर्थिक वर्षात, ऊर्जा विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्याने जुलैमध्ये युनिट्सच्या बाबतीत सर्वाधिक विक्री केली. एक हजार २९२ दशलक्ष युनिट्सची मागणी होती. तर एक हजार १६२ दशलक्ष युनिट्स (एमयु) इतकी वीज विकली गेली. जुलैमध्येच महसुलात ३७७ कोटी रुपयांची वाढ झाली. तथापि, महसुलाच्या बाबतीत सर्वाधिक विक्री ऑगस्ट २०२१ मध्ये झाली. ६०२ दशलक्ष युनिट ऊर्जेची ५०७ कोटी रुपयांना विक्री झाली. एकूणच, कर्नाटकाने संपूर्ण आर्थिक वर्षात सरासरी ४.३ रुपये प्रति युनिट दराने वीज विकली.
कोळशाचा तुटवडा आणि वाढत्या मागणीमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे या आर्थिक वर्षात झालेला नफा ठळक दिसत आहे. जोपर्यंत स्टोरेजची स्थिती वाढवत नाही आणि राज्यात अतिरिक्त वीज वापरली जात नाही, तोपर्यंत वीज विक्री सुरूच राहील, असे कर्नाटकचे ऊर्जा मंत्री व्ही. सुनीलकुमार म्हणाले.
२५ दिवसांत ८०० कोटींचे उत्पन्न
गेल्या २५ दिवसात राज्याने अतिरिक्त ऊर्जेच्या विक्रीतून तब्बल ८०० कोटी रुपये खिशात टाकले आहेत. अशीच वीजनिर्मिती कायम राहिल्यास पुढील १० महिन्यांत महसुलात आणखी भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे आणि गेल्या आर्थिक वर्षापेक्षा जास्त कमाई होण्याची शक्यता आहे.