मुंबई (Mumbai) : कळवा ते कल्याण रेल्वेमार्गाला समांतर खाडीकिनारा आहे. या किनाऱ्यांचा विकास करून रेल्वेला समांतर असा ठाणे- कळवा ते कल्याण समांतर रस्ता बांधण्याचे नियोजन असल्याचे कल्याण लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक साधणारे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. कल्याणच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार असल्याची माहिती त्यांनी दिली.
डोंबिवलीत रस्ते अरुंद आहेत. त्यावर उपाय म्हणून टंडन रस्त्यावरून थेट दावडी नाक्यापर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येईल. त्याच पद्धतीने पश्चिमेलाही थेट माणकोलीपर्यंत पूल बांधून वाहनांचा वेग वाढवण्याचे नियोजन असेल. ठाकुर्लीतून ९० फूट रस्त्याला जोडणारा पूलही तयार केला जाईल. बदलापूर पाईपलाईन रस्त्याची कोंडी सोडवण्यासाठी तेथेही पूल बांधण्याचे नियोजन आहे. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात एक धरण बांधण्यात येणार असल्याने त्याद्वारे येथील पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. कळवा ते कल्याण रेल्वेमार्गाला समांतर खाडीकिनारा आहे. या किनाऱ्यांचा विकास करून रेल्वेला समांतर असा ठाणे- कळवा ते कल्याण समांतर रस्ता करण्याचे नियोजन आहे. सध्या कल्याण ते डोंबिवली आधीच रस्ता तयार असून त्यातील तांत्रिक अडथळे दूर करून तो रस्ता पुढे दिवा, मुंब्रा मार्गे कळव्यापर्यंत नेण्यात येईल.
बदलापूर ते ठाणे हद्दीत एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करून परवडणाऱ्या दरात बस सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आरामदायी सेवा देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याची अंमलबजावणी करणार आहे. ठाकुर्ली, कल्याण पूर्व, अंबरनाथ येथे सरकारी भूखंडावर आबालवृद्ध नागरिकांसाठी मोकळी सुसज्ज जागा, मनोरंजन पार्क करण्यात येईल. त्यादृष्टीने पालिका यंत्रणांसमवेत नियोजन करण्यात येणार आहे. अपघातग्रस्त प्रवाशांना अनेकदा गोल्डन अवरमध्ये उपचार मिळत नाहीत. जखमींवर तातडीने उपचार होण्यासाठी गर्दीच्या रेल्वे स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारण्यात येईल असे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्याला भेडसावणारा रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी सुसज्ज रक्तपेढी निर्माण करून शक्यतो विनामूल्य तत्त्वावर ती चालवून गरजूंची गैरसोय दूर करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.