मुंबई (Mumbai) : उल्हासनगरातील तीन मोठ्या कंपन्यांशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. ईगल इन्फ्रा लिमिटेड, रिजेन्सी प्रायव्हेट लिमिटेड आणि कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर या तीन मोठ्या कंपन्यांच्या संचालक आणि भागीदारांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर ही छापेमारी मारण्यात आली. ईगल इन्फ्रा कंपनीला सध्या उल्हासनगरातील भूयारी गटार योजनेचे 416 कोटींचे टेंडर देण्यात आलेले आहे. तर रिजेन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे उल्हासनगर शहरातील कचरा उचलण्याचा ठेका आहे. या तिन्ही कंपन्यांकडे राज्याच्या अन्य भागातील विकासकामांची मोठ-मोठी टेंडर आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये बहादूर शेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामाचा १५० ते २०० मीटरचा मोठा भाग कोसळला आहे. 'ईगल इन्फ्रा' कंपनीकडे या पुलाच्या कामाचे टेंडर आहे. या कंपन्यांच्या भागीदारांकडे कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे सापडली असल्याची माहिती विश्वस्त सूत्रांकडून देण्यात आली आहे. या धाडसत्रामुळे शहरातील व्यापारी आणि उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. उल्हासनगरातील ईगल इन्फ्रा लिमिटेड, रिजेन्सी प्रा. लिमिटेड कंपनी आणि कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर या तीन मोठ्या कंपन्यांच्या संचालक आणि भागीदारांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाच्यावतीने छापेमारी मारण्यात आली.
हा छापा रिजन्सी कॉम्प्लेक्समधील अन्टॅलिया येथे रिजन्सी कंपनीचे संचालक, कंपनीचे इतर भागीदार तसेच ईगल इन्फ्रा कंपनीच्या चार भागीदारांच्या निवासस्थानी तसेच त्यांच्या कार्यालयावर मारण्यात आला आहे. ईगल इन्फ्रा कंपनीच्या एका भागीदाराच्या घरातून करोडो रुपयांची रोकड हाती लागली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ईगल इन्फ्रा कंपनीला सध्या उल्हासनगरात भूयारी गटार योजनेसाठी 416 कोटींचा ठेका देण्यात आलेला आहे. हा ठेका रद्द करण्यासाठी नुकतेच मनसेच्यावतीने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आलेले आहे. रिजेन्सी ही बांधकाम कंपनी असून या कंपनीच्यावतीने उल्हासनगर नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली समवेत अन्य शहरात टोलेजंग इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. तसेच कंपनीकडे शहरातील कचरा उचलण्याचा ठेका महापालिकेने दिला आहे. या तिन्ही कंपन्यांकडे उल्हासनगर व्यतिरिक्त राज्याच्या अन्य शहरातील विकासकामांची टेंडर आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या संचालक आणि भागीदारांच्या कार्यालयावर आणि निवासस्थानी छापे मारण्यात आल्यामुळे शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.