Samruddhi Mahamarg

 

Tendernama

टेंडर न्यूज

राधेश्याम मोपलवारांची खरी 'समृद्धी'; सहाव्यांदा मुदतवाढ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : बाकी कुणाची होवो ना होवो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar) यांची खरी 'समृद्धी' झाली आहे. या पदावर निवृत्तीनंतर मोपलवार यांना तब्बल सहाव्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गात या महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. महामार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबतची कामे आता अंतिम टप्प्यात असून हा रस्ता लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच जाहीर केले आहे. तसेच करार पद्धतीने कार्यरत असलेले राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णयही सरकारने जाहीर केला आहे.

राधेश्याम मोपलवार हे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त सनदी अधिकारी आहेत. निवृत्त झाल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीकरिता करार पद्धतीने त्यांची राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर २८ फेब्रुवारी २०१८ मध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांच्या नियुक्तीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. २८ फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांना पुन्हा तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली, तर २८ मे २०२० मध्ये पुन्हा एक वर्षासाठी सरकारने मुदतवाढ दिली. २८ मे २०२०, ४ जून २०२१ मध्ये सहा महिन्यांसाठी तर ३० नोव्हेंबर २०२१ मध्ये तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ मिळालेल्या मोपलवार यांना सरकारने सहाव्यांदा सहा महिन्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

राधेश्याम मोपलवार हे नेहमीच चर्चेत राहिले. आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोकण विभागीय आयुक्त, अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांना मिळाल्या. भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये महत्त्वाकांक्षी समृद्धी प्रकल्पाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, ऑगस्ट २०१७ मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या कथित ऑडिओ क्लिपचे आरोप झाले. या आरोपानंतर मोपलवार यांना पदावरून हटविण्यात आले. दोन महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर मोपलवार यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने क्लिन चीट दिल्यानंतर त्यांना डिसेंबर २०१७ मध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आले.

राधेश्याम मोपलवार हे आजी माजी सगळ्याच नेत्यांच्या मर्जीतील अधिकारी मानले जातात. महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात मोपलवार यांनी खूपच महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प लवकर पूर्णत्वास जाईल, अशी सरकारची धारणा आहे. त्यामुळेच त्यांना आतापर्यंत सहावेळा विक्रमी मुदतवाढ मिळाली आहे.