Housing Tendernama
टेंडर न्यूज

परवडणाऱ्या गृहप्रकल्पांना 'अच्छे दिन'! पुणेकरांचा ओढा फक्त...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : स्वतःचे घर असावे अशी इच्छाशक्ती आणि त्यातून सदनिका घेण्याचा निर्णय वाढत असल्याने कोरोनानंतर घरांची मागणी आणि विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याचे गेल्या तिमाहीतील स्थितीतून स्पष्ट होते. पुण्यातील बांधकाम क्षेत्राबाबत काही संस्थांनी केलेल्या सर्व्हेतून देखील ही बाब पुढे आली आहे. घराचे स्वप्न साकार करीत असताना मध्यम किंमत असलेले किंवा आपल्याला परवडतील अशाच गृहप्रकल्पांना पसंती मिळत आहे.

एप्रिल ते जून या यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत ५० लाखांपेक्षा कमी किमतीची २९ टक्के तर ५०-७५ लाखांच्या दरम्यानची ३५ टक्के घरे पुण्यात विकली गेली आहेत. या विक्रीत उत्तर पूर्व उपविभागामधील बालेवाडी, हिंजवडी आणि वाकड यांचा मोठा समावेश आहे. २०२१ च्या
पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदा सदनिकांच्या विक्रीत १३३ टक्के वाढ झाली आहे. तर गत वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत घरांची विक्री १४६ टक्क्यांनी वाढली आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांच्या किमतीत आणि गृहकर्जाच्या व्याजदरात गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. त्यामुळे घरी काहीसे महागले असले तरी पुण्यातील घर खरेदी वाढतच असल्याचे चित्र जेएलएलच्या रिअल इस्टेट इंटेलिजन्स सर्व्हिसेसच्या (आरईआयएस) अहवालात दिसत आहे.

तिमाहीनिहाय घरांची विक्री
शहरे - वार्षिक तुलनेत वाढ (टक्के)
पुणे - १४६
मुंबई - १०९
बंगळूर- २२१
चेन्नई - १५९
दिल्ली - ३१३
हैदराबाद - ७५
कोलकता - ५८३
एकूण -१७१
(स्रोत- रिअल इस्टेट इंटेलिजन्स सर्व्हिस (आरईआयएस), जेएलएल रिसर्च)

अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
- दुसऱ्या ‍तिमाहीत १३ हजार ९५ घरांच्या नवीन प्रकल्पांची सुरवात
- त्यातील अधिक प्रकल्प हे उत्तर उप विभागात व त्यानंतर वायव्य उपविभागात
- न विकल्या गेलेल्या घरांमध्ये झाली वाढ
- कारण विक्रीपेक्षा नवीन प्रकल्पांची संख्या अधिक
- घरांच्या विक्रीच्या दृष्टीने पुण्यात चांगला प्रतिसाद
- खरेदीदारांचा आत्मविश्वास परत येत आहे

तरच विकसक टिकतील
बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमतीचा भार विकसकांनी खरेदीदारांवर टाकला आहे. तर व्याजदर देखील वाढत आहे. यामुळे अगदी थोड्या कालावधीसाठी विक्री कमी होताना दिसली. पण कोरोनाच्या साथीवर नियंत्रण आल्याने खरेदीदारांचा उत्साह वाढला. नवीन प्रकल्पांची सुरवात आणि विक्रीही सुधारला. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन व त्यांची काळजी घेणारे, योग्य क्षमता असलेले, गुणवत्तापूर्ण उत्पादने देणारे विकसकच यापुढील काळात टिकून राहतील आणि अधिक सक्षमपणे पुढे जातील, असा विश्‍वास या अहवालात नमूद करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात मुद्रांक शुल्कावर एक टक्का मेट्रो उपकर लागू करण्यात आला आहे. तसेच व्याजदर देखील वाढले आहेत. असे असतानाही पुण्यात या तिमाहीत परवडणाऱ्या व मध्यम घरांची विक्री वाढली आहे. लॉकडाउनच्या काळात गावी गेलेले अनेक कर्मचारी आता पुन्हा शहरात परतले आहे. बदललेल्या वर्क कल्चरमुळे या कर्मचाऱ्यांना मोठ्या घराची गरज भासत आहे.
- डॉ. समंतक दास, मुख्य अर्थतज्ज्ञ व आरईआयएस विभाग प्रमुख, जेएलएल इंडिया

स्वतःच घर हवं हे कोरोना काळात प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे आम्ही या वर्षी घर खरेदीचा निर्णय घेतला. त्यानुसार उपनगरात परवडणाऱ्या किमतीत घर खरेदी केले आहे. आमचे बजेट ५० लाख होते. व्याजदर आणि घरांच्या किमती वाढण्यापूर्वी आम्ही घराचे स्वप्न साकार केले.
- अलका मारणे, नोकरदार