Mumbai Municipal Corporation

 

Tendernama

टेंडर न्यूज

मुंबई महापालिका निवडणूक; शेवटच्या बैठकीत इतक्या हजार कोटींची कामे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महापालिकेच्या स्थायी समितीची शेवटची बैठक ७ मार्च रोजी होणार आहे. या बैठकीत रुग्णालये, रस्ते, मलनि:सारण, अग्निशमन दल, जलाशये, रुग्णालये आदींबाबतचे तब्बल चार हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त किंमतीचे एकूण २९७ प्रस्ताव मंजुरीला येणार आहेत. हे सर्व प्रस्ताव विनाचर्चा मंजूर होऊ नयेत, त्यातील चुका, त्रुटी याबाबत भाजप नक्कीच प्रयत्न करेल. त्यामुळे ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्चअखेर संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी विकास कामांचे महत्वाचे चार हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहेत. वास्तविक, गेल्या बैठकीतही किमान दोन हजार कोटी रुपयांचे १७९ प्रस्ताव आणि अगोदरचे १२ प्रस्ताव असे एकूण १९१ प्रस्ताव मंजुरीला आले होते. मात्र काही कारणास्तव या १९१ पैकी ९६ प्रस्ताव म्हणजेच ५५% प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. तर ८५ प्रस्ताव म्हणजेच ४५% प्रस्ताव राखून ठेवण्यात आले होते.

आता ७ मार्च रोजी होऊ घातलेल्या बैठकीत साडेतीन हजार कोटी रुपयांचे २०२ नवीन प्रस्ताव अधिक अगोदरच्या बैठकीतील ६०० कोटीपेक्षाही जास्त किंमतीचे प्रस्ताव मंजुरीला येणार आहेत.

स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत, नाहूर रुग्णालयाच्या विकास कामाचा ७६९ कोटी रुपयांचा प्रस्ताव, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे विकास काम (शताब्दी) ५०९ कोटी रुपये, मलबार टेकडी जलाशयाचे विकास काम ६९८ कोटी रुपये, नायर रुग्णालयाचे काम ३४८ कोटी रुपये, पवई – घाटकोपर जलाशय बोगदा ६०७ कोटी रुपये, अग्निशमन दल १२६ कोटी रुपये, मलनि:स्सारण वाहिन्यांचे काम ८० कोटी रुपये, दक्षिण मुंबईतील लहान रस्ते कामे २३ कोटी रुपये, नाल्यांचे बांधकाम २२ कोटी रुपये, मानखुर्द लहान रस्ते २६ कोटी रुपये, कुर्ला लहान रस्ते २५ कोटी रुपये, अगोदरचे अंदाजे ६०० कोटींचे प्रलंबित प्रस्ताव आणि इतर कामांचे ३०० कोटींचे प्रस्ताव मांडले जाणार आहेत.