Bullet Train Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai-Ahmedabad Bullet Train : ठाणे डेपोसाठी 'या' कंपन्यात चुरस

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा ठाणे येथील देखभाल-दुरुस्ती डेपो उभारण्यासाठी ४ कंपन्यांमध्ये चुरस आहे. दिनेशचंद्र-डीएमआरसी जेव्ही, केईसी इंटरनॅशनल, लार्सन अँड टुब्रो आणि एससीसी-प्रेमको या कंपन्यांमध्ये हे टेंडर मिळवण्यासाठी स्पर्धा आहे.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी बुलेट ट्रेनचे स्थानक होणार आहे. तिथून ते ठाणे जिल्ह्यातील शिळफाटापर्यंतचा टप्पा पॅकेज सी टू मध्ये येतो. याअंतर्गत ठाणे जिल्ह्यात डेपोचे स्थानक होणार आहे, त्या ठिकाणी डिझाईन, बांधकाम तसेच सिव्हिल वर्क, बिल्डिंग वर्क तर डेपोशी अनुषंगिक इन्स्टॉलेशन, चाचणी, देखभाल सुविधा इतर कामे अशा सर्व बाबींचे हे टेंडर आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने डिसेंबर २०२२ मध्ये टेंडर प्रसिद्ध केले होते. बुलेट ट्रेनच्या भुयारी मार्गामध्ये रेल्वे स्थानके, अनेक ठिकाणी पूल, बोगदे होणार आहेत. येथील नागरी कामांसाठी डेपोचा समावेश असलेली इमारत असणार आहे. यामध्ये एकूण तीन इमारती उभ्या केल्या जाणार आहेत. तसेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाणे, विरार तसेच बोईसर आणि गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेलगत शिळफाटा आणि जरोली गावाच्या दरम्यान ठाणे जिल्ह्यात डेपोसाठी जोडणीची कामे केली जाणार आहेत. हे अंतर जवळजवळ 135 किलोमीटर आहे. जे पॅकेज सी ३ मध्ये होणार आहे.

ज्या चार कंपन्यांनी हा डेपो बांधण्यासाठी टेंडर भरले आहे, त्यामध्ये दिनेशचंद्र-डीएमआरसी जेव्ही, केईसी इंटरनॅशनल, लार्सन अँड टुब्रो आणि एससीसी-प्रेमको यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या टेंडरची तांत्रिक मूल्यमापन तपासणी करून नंतर तांत्रिकदृष्ट्या पात्र कंत्राटदारांच्या आर्थिक टेंडर उघडून सर्वांत कमी दराचे टेंडर असलेल्या कंत्राटदारास हे काम देण्यात येणार आहे. कामाच्या व्याप्तीमध्ये ठाणे डेपोची रचना आणि बांधकाम समाविष्ट आहे, ज्यामध्ये रस्ते, गटारे, इमारतींचे बांधकाम, तपासणी शेड, गाड्यांची दैनंदिन तपासणी, त्या धुण्यासाठी जलाशयांची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय जपान येथून मागविलेली ८०० हून अधिक उपकरणे बसवून त्यांची प्रत्यक्षात तपासणी करून रीतसर चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतरच हा डेपो कार्यान्वित करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्याच्या भारोडी आणि अंजूर गावाजवळील ६० हेक्टर जमिनीवर हा डेपो बांधण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनसाठी प्रसिद्ध असलेल्या शिंकनसेन ट्रेन-सेटची देखभाल या ठिकाणी करण्यात येणार आहे. साबरमती डेपोनंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा डेपो असणार असून, आणखी एक डेपो सुरत येथे बांधण्यात येत आहे. साडेपाच वर्षांत ठाणे येथील डेपोचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकासाठी २२ हेक्टर जागेचे संपादन करण्यात आले आहे. यात ठाणे पालिका क्षेत्रातील खासगी मालकीची जमीन १८ हेक्टर ८ आर ८१ चौ. मीटर, मरेच्या मालकीची ४२ आर ३९ चौ. मीटर, राज्य शासनाच्या दोन हेक्टर ३२ आर १० चौ. मीटर जमिनीचा समावेश आहे. यासाठी आगासन, म्हातार्डी, बेतवडे, डावले, पडले, शीळ व देसाई आदी ठिकाणांवरील अतिक्रमणे काढली आहेत.