पुणे (Pune) : G 20 परिषदेसाठी एक आठवडा शिल्लक असताना महापालिकेची (PMC) तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. पण, प्रशासनातील विविध विभागात समन्वयाचा अभाव असल्याने कधी कोणत्या रस्त्यावर खोदकाम होईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे ११ ते १८ जानेवारीपर्यंत रस्ते खोदण्यावर प्रशासनाने बंदी घातलेली आहे.
पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेलमध्ये १५ ते १७ जानेवारीदरम्यान ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी २० सदस्य देशांसह निमंत्रित देशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये या देश विदेशातील प्रतिनिधींना योग्य पाहुणचार देण्यासह त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ही महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे प्रतिनिधी ज्या रस्त्याने जाणार आहेत. तेथे चोख तयारी करण्यात आलेली आहे. तसेच परिषद संपल्यानंतर शहरातील पर्यटन स्थळांना ते भेट देऊ शकतात. त्यामुळे सर्व रस्ते चांगले ठेवावेत. यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
त्यातच शहरात समान पाणीपुरवठा योजनेसह भूमिगत वीजवाहिन्या, मोबाईल व इंटरनेटसाठीच्या केबल्स यासाठी खोदकाम केले जात आहे. या कामांमुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. बैठकीच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी शहर फिरण्यासाठी अथवा अन्य कारणांसाठी बाहेर पडल्यास ते वाहतूक कोंडीत अडकू नयेत किंवा त्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसू नये, यासाठी या काळात खोदकाम करण्यास बंदी घालण्यात येईल, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.