Fastag Tendernama
टेंडर न्यूज

'फास्टॅग' यंत्रणेची लागली वाट; वाहन घरीच तरीही खात्यातून पैसे कट

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : वाहन घरीच असताना टोल कपात होणे, बँक खात्यांत रक्कम शिल्लक असताना देखील टोल कपात न होणे, तर कधी खाते ‘इनॲक्टिव्ह’ असल्याचे सांगत जेवढा टोल तितकाच दंड वसूल केला जात आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सातारा मार्गावरील खेड शिवापूरचा टोल नाका असो की, मुंबई मार्गावरील सोमाटणे फाट्यावरील टोलनाका असा, सगळीकडे परिस्थिती सारखीच! वाहनधारकांना टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबायला लागू नये यासाठी राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर ‘फास्टटॅग’ची प्रणाली सुरु केली आहे. त्यासाठी स्वतंत्र लेन असली तरीही त्यावरही वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्यांच्याकडे ‘फास्टटॅग’ नाही, अशा वाहनधारकांकडून रोख टोल वसूल केला जातो. तसेच त्यांच्याकडून दंडही वसूल केला जात असून हे अन्यायकारक आहे. कारण बऱ्याचदा टोल प्रशासनाच्या चुकीमुळे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

‘फास्टटॅग’बाबतच्या तक्रारी
उशिराने पैसे कट होणे, खात्यांत रक्कम शिल्लक असतानाही ते इनॲक्टिव्ह किंवा ब्लॅकलिस्टेड दाखविणे, आदी प्रकारामुळे वाहनधारकांकडून टोलसोबत दंडही देखील वसूल केला जात आहे. कार्ड रीड झाल्यानंतर अर्ध्या तासात वाहनधारकांच्या खात्यांवरून रक्कम वसूल केली जाते. म्हणजे एका वाहनधारकाकडून तीन टोलची रक्कम वसूल केली जाते आहे.

‘फास्टटॅग’बाबत ५ ते १० टक्के तक्रारी
मुंबई द्रुतगती मार्गावर तीन टोल नाके आहेत. तर पुणे-कोल्हापूर मार्गावर चार टोल नाके आहेत. कोल्हापूर मार्गावर खेड शिवापूर टोल नाक्यावरून दररोज सरासरी ६० ते ७० हजार वाहने धावतात. तर मुंबई मार्गावरून ७० ते ७२ हजार वाहने धावतात. शनिवार व रविवारी ही संख्या ९० हजारांच्या आसपास असते. यात ‘फास्टटॅग’च्या तक्रारींचे प्रमाण ५ ते १० टक्के इतके आहे.

त्रुटी काय आहेत?
लेनच्या बूम जवळ वाहन आल्यास सीसीटीव्ही कॅमेरा वाहनावरील ‘फास्टटॅग’चे कोड रीड करतो. त्यानंतर वाहनधारकांच्या खात्यांच्या ‘वायलेट’मधून तेवढी रक्कम वसूल केली जाते. आता टोलचा रिचार्ज देखील करता येतो. रिचार्ज झाल्यावर ती रक्कम टोलचा कर म्हणून वसूल होते. यातील त्रुटी म्हणजे या यंत्रणेतील सीसीटीव्ही कॅमेरे तुलनेने कमी क्षमतेचे आहेत. तसेच कारवर एकापेक्षा अधिक ‘फास्टटॅग’चे स्टिकर्स असतील, तर रीड करण्यात गोंधळ होतो. या त्रुटी दूर केल्या पाहिजे.

सिंगापूरची व्यवस्था भारतात कधी?
सिंगापूरमध्ये टोल प्लाझाच्या ठिकाणी मोठ्या कमानी उभारल्या आहेत. या टोल प्लाझातून वाहन कधी निघून गेले हे कळत देखील नाही. शिवाय ही यंत्रणा मनुष्यविरहीत आणि अद्ययावत आहेत. अशी यंत्रणा भारतातील टोलनाक्यांवर उभारण्याची गरज आहे.

राज्यातील टोलनाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि वाहनचालकांचा वाया जाणारा बहुमूल्य वेळ आदींवर उपायासाठी फास्टॅग यंत्रणा राज्यात राबविण्यात येत आहे. फास्टॅग यंत्रणेचा फायदा होत असला तरी फास्टॅगची नोंदणी न होणे, तो स्कॅन न होणे, वाहनचालकांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसणे आदी कारणांमुळे या यंत्रणेची गती मंदावत आहे.

तासवडे टोलनाका

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे हा टोलनाका सध्या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या देखरेखीखाली चालवला जातो. टोल वसुलीचे कंत्राट ‘केसीसी अँण्ड फास्टगो’ या जाँईंट व्हेंचर कंपनीकडे २४ जूनपर्यंत आहे. दोन महिन्यांपूर्वी हा नाका या कंपनीकडे आला आहे. मात्र, वाहनधारकाने आपला फास्टॅग रिचार्ज केला नसल्यास किंवा फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसल्यास तसेच फास्टॅग स्कॅन झाला नाही तर एका गाडीमुळे टोलनाक्यावर लांबच लांब रांगा लागतात. परिणामी, त्यावरुन वादावादीचे प्रकारही घडतात. याठिकाणी सध्या फास्टॅगची अद्ययावत यंत्रणा असल्याने फास्टॅग संदर्भात अत्यल्प तक्रारी आहेत.

टोलनाक्यावर प्रवास करताना गाडीला फास्टॅग कार्यान्वित नसल्यास किंवा बसविला नसल्यास संबंधित वाहनधारकांकडून एनएचआयच्या नियमानुसार टोलची दुप्पट रक्कम वसूल केली जाते. बहुतांश वेळा दुप्पट टोल रक्कम भरण्याच्या कारणावरून वाहनधारक व टोल यंत्रणा यांच्यात खटके उडतात. काही तांत्रिक कारणामुळे फास्टॅग स्कॅन न झाल्यास किंवा फास्टॅगमधून दोन वेळा पैसे वजा झाल्यास वाहनधारकाने एनएचआयच्या १०३३ या हेल्पलाइनवर तक्रार नोंदविल्यानंतर त्यांच्या तक्रारीची शहानिशा करून टोलची रक्कम नियमानुसार परत देण्याची तरतूद आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या फास्टॅगसंदर्भात अजिबात तक्रारी नाहीत.

टोलनाका चालविणारी कंपनी

‘केसीसी अँण्ड फास्टगो’

- फास्टॅग स्कॅन न झाल्यास वाहनांच्या रांगा.

- वाहनचालकाच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास वाद

- वाहनधारकांच्या खात्यातून ऑनलाइन टोलची रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न

आनेवाडी टोलनाका

पुणे-बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर फास्टॅग यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करत नाही. सध्या टोलनाका रिलायन्य कंपनीकडे आहे. रिलायन्स कंपनीने राष्ट्रीयकृत बँकांकडे फास्टॅगचे व्यवस्थापन दिले आहे. वाहनचालकांच्या खात्यात रक्कम असतानाही फास्टॅग रजिस्टर न झाल्याने गोंधळ होत असून वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे वेळ वाया जात आहे. तक्रारींचे प्रमाणही वाढले आहे. कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. शौचालय तसेच टोलनाक्याच्या दोन्ही बाजूस दोन किलोमीटर प्रकाश पाहिजे असतानाही अर्धा किलोमीटरपर्यंतच तो उपलब्ध आहेत. येथील अधिकारी गाडीच्या चाशी क्रमांकावर फास्टॅग रजिस्टर नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे सांगत आहेत.याबाबत कसलेही संशोधन झाले नाही व सुरूही नाही. इतर टोलनाक्यावर उत्तम व्यवस्था असतानाही या ठिकाणी मात्र अडचणी कायम आहेत.

टोलनाका चालविणारी कंपनी

रिलायन्स

- फास्टॅग रजिस्टर न झाल्याने वाहनांच्या रांगा

- अपुरी प्रकाशव्यवस्था, नियमानुसार सुविधाही उपलब्ध नाहीत

-------------

किणी येथील टोलनाका

पुणे-बंगळूर महामार्गावरील सातारा ते कागल दरम्यानचे चौपदरीकरण राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, दिल्ली यांच्या माध्यमातून रस्ते विकास महामंडळाने केले. चौपदरीकरणावर झालेल्या खर्चासाठी तासवडे (जि. सातारा) व किणी (ता. हातकणंगले) येथे टोलनाके उभारण्यात आले. टोलवसुलीसाठी रस्ते विकास महामंडळाला २ मे २००२ ते २ मे २०२२ दरम्यान मुदत देण्यात आली. टोलवसुली सध्या नागपूर येथील के.सी. सी.अँड फास्ट गो यांच्याकडे आहे. टोलवसुली यंत्रणा ९० टक्के चांगल्या पद्धतीने काम करत असून फास्टॅगबद्दल तक्रारींचे प्रमाण १० टक्के आहे.

टोलनाका चालविणारी कंपनी

के.सी. सी.अँड फास्ट गो (नागपूर)

-फास्टॅग यंत्रणा सुरु झाल्यापासून वाहनांच्या रांगा कमी झाल्या आहेत. केवळ रविवारी आणि सलग सुट्या असताना वाहनांच्या रांगा.

-फास्टॅग काही सेंकदांत स्कॅन होतो. काही वेळा वाहनचालकाच्या खात्यात रक्कम नसल्यामुळे टोल दुप्पट द्यावा लागतो.

- कधीकधी वाहनातील फास्टॅग रजिस्टर होत नसल्याने वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागतो.