Devendra Phadnavis Tendernama
टेंडर न्यूज

फडणवीसांचा 'हा' महत्त्वाकांक्षी प्रकल्प वादात; मोठा आर्थिक भुर्दंड

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-विक्रोळी-कांजूरमार्ग मेट्रो ६ (Mumbai Metro-6) मार्गिकेची कारशेड कांजूरमार्गमध्ये (Kanjurmarg Car Shed) प्रस्तावित केली होती. मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात मालकी हक्कावरून वाद सुरू असल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका मेट्रो-६ ला बसण्याची चिन्हे आहेत. या मार्गाचे काम २०२१-२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, मेट्रो ६च्या कारशेडचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रस्तावित ६,६७२ कोटींच्या खर्चात मोठी वाढ अटळ आहे. (Devendra Fadnavis - Narendra Modi)

नुकतेच भुयारी मेट्रो 3 म्हणजे कुलाबा वांद्रे सीप्झ या मार्गाच्या अंमलबजावणीत दिरंगाई झाल्यामुळे ६ वर्षात प्रकल्प खर्चात तब्बल 10 हजार कोटींची वाढ झाली आहे. 2018 च्या अंदाजानुसार प्रकल्प खर्च 23 हजार कोटी इतका अपेक्षित होता. आता या प्रकल्पाचा खर्च 33 हजार 406 कोटींवर गेला आहे.

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि जनतेचा प्रवास सुखकर करण्यासाठी एमएमआरडीएमार्फत मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. तसेच पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरांमधील अंतर कमी करून येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो ६ प्रकल्प हाती घेतला आहे. स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-विक्रोळी-कांजूरमार्ग मेट्रो ६ प्रकल्पाला राज्य सरकारने २०१६ मध्ये मंजुरी दिली. १४.४७ किलोमीटर लांबीच्या मेट्रो ६ मार्गावर १३ स्थानके प्रस्तावित आहेत. मार्गाचे काम २०२१-२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मार्गासाठी कांजूरमार्गमध्ये कारशेड तयार करण्याचे प्रस्तावित होते. राज्यात सत्तांतर होताच आरेमध्ये होणारी मेट्रो ३ ची कारशेड कांजूरमार्गमध्ये हलविण्यात आले. मात्र, येथील जमीन देण्यास केंद्र सरकारने विरोध केल्याने आणि जमिनीचा वाद न्यायालयात गेल्याने कारशेड रखडले. आता राज्यात पुन्हा सत्तांतर होताच मेट्रो ३ ची कारशेड पुन्हा आरेमध्ये हलविण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो ३ च्या कारशेडचा प्रश्न मार्गी लागला आहे.

मेट्रो ३, मेट्रो ६ आणि मेट्रो ४ ची कारशेड एकाच ठिकाणी झाल्यास प्रकल्पाचा खर्च कमी होईल, अशा हेतूने महाविकास आघाडी सरकारने कांजूरमार्गच्या जमिनीचा पर्याय निवडला होता. कांजूरमार्गची जमीन मिळत नसल्याने महाविकास आघाडी सरकारने पहाडी गोरेगाव भागातही दोन्ही मेट्रोंसाठी एकत्रित कारशेड उभारण्याचा पर्याय शोधला. मात्र, त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. अखेर मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्ये उभारण्याचा निर्णय झाला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात मालकी हक्कावरून वाद सुरु असल्याने त्याचा फटका मेट्रो ६ ला बसला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून मेट्रो ६ च्या कारशेडचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही.

मेट्रो ६ मार्ग २०२१-२२ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत ६० टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत. इतर कामे होण्यास वर्षभराचा कालावधी लागणार असला तरी कारशेडचा प्रश्न मार्गी न लागल्याने प्रकल्प रखडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मेट्रो ६ ची कारशेड कांजूरमार्गमध्ये उभारण्यास एमएमआरडीए अधिकारी इच्छूक आहेत. त्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही कांजूरमार्गच्या जागेसाठी सकारात्मक असल्याने ते तिथेच होईल, अशी अपेक्षा आहे.