मुंबई (Mumbai) : राज्यात सत्तांतर होताच बुलेट ट्रेन सुसाट सुटणार असल्याचे वृत्त 'टेंडरनामा'ने बुधवारी (ता. १३) दिले होते, त्यावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे सरकारने बुलेट ट्रेनसाठी सर्व प्रकारची मुंजरी दिली आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अतिमहत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळणार आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा नरेंद्र मोदी यांचा अतिमहत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, जमीन हस्तांतरण प्रक्रिया धिम्या गतीने सुरू असल्याने या प्रकल्पाला वेळ लागला. तसेच, कोविडच्या काळातही हे काम थांबले होते. त्यामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील केवळ २० टक्केच जमिनीचे हस्तांतरण झाले आहे. महाविकास आघाडी सरकारचा या प्रकल्पाला विरोध होता, त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारला या प्रकल्पाबाबत उचित सहाय्य केले नाही.
राज्यात शिंदे - फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे. हे सरकार सत्तेत येताच, मुंबई - अहमदाबाद प्रकल्पाला गती प्राप्त होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. यासंदर्भात सरकारने आता सर्व प्रकारची मंजुरी दिली आहे. ५०८ किमीचा हा प्रकल्प असून, यामुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या काही तासांमध्ये होणार आहे.
मुंबई ते अहमदाबादपर्यंत एकूण १२ स्थानके असतील. यामध्ये आठ स्थानके गुजरातमध्ये असून, ४ स्थानके महाराष्ट्रात असतील. साबरमती ते वापीपर्यंत एकूण ३५२ किलोमीटरचा प्रवास गुजरातमध्ये असेल. या सेक्शनमध्ये ६१ किलोमीटरपर्यंत पिलर लागले असून, १७९ किमीपर्यंत काम सुरू आहे.