मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर पालिकेतील (Mumbai Municipal Corporation) २९ हजार सफाई कामगारांना पुढील दोन वर्षांत ३०० चौरस फुटांची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच विधान परिषदेत दिली. यासंदर्भात सदस्य प्रसाद लाड, भाई गिरकर, सुनील शिंदे आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना १२ हजार निवासस्थाने देण्यात येणार आहेत. यासाठी डिझाईन ॲण्ड बिल्ट टर्नकी बेसिसवर निविदा व फेरनिविदा मागवण्यात आल्या होत्या. त्याद्वारे २९ हजार कर्मचाऱ्यांना ही घरे द्यायची असून, ही जागा दाटीवाटीच्या ठिकाणी असल्याने बांधकामास २४ महिन्यांची मुदत देण्यात आली.
मुंबई महापालिका क्षेत्रात सफाई कामगारांच्या ४६ वसाहती असून, त्यातील २९ हजार ८१६ कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे ५ हजार ५९२ कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थाने देण्यात आली आहेत. गट-२ व गट-३ मधील १२ वसाहतींचा पुनर्विकास कंत्राटदारांमार्फत करण्यात येणार असून, देखभाल व दुरुस्तीचा कालावधीचा १० वर्षांचा करण्यात आला आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.