मुंबई (Mumbai) : राज्याच्या इलेक्ट्रिक बस धोरणानुसार राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) अर्थात एसटीने राज्यातील रस्त्यांवर इलेक्ट्रिक बसेस (Electric Buses) उतरवण्याची तयारी केली आहे. ई-बसेस पुरवणाऱ्या कंत्राटदारांचा एसटी महामंडळाशी नुकताच करार झाला असून, 1 जून रोजी एसटीच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.
या ई-बसेसच्या नियोजनाची जय्यत तयारी महामंडळात सुरू आहे. वाहतूक उपमहाव्यवस्थापक यामिनी जोशी यांनी औरंगाबाद येथे 11 मे रोजी दोन दिवसीय आढावा बैठक आयोजित केली असून, यामध्ये मुख्यतः मराठवाडा, विदर्भातील इलेक्ट्रिक बसेसच्या मार्गाचे नियोजन केले जाणार आहे.
इलेक्ट्रिक बसेसचे थांबे, सोयीस्कर असलेले लांब मार्ग, चांगले रस्ते शोधणे, चार्जिंग पॉईंट उभारणी असा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी या आढावा बैठकीत नियोजन केले जाणार आहे. यामध्ये संबंधित वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मराठवाडा, विदर्भातील विभाग नियंत्रक सुद्धा उपस्थित राहणार आहेत. इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यासंदर्भातील सर्वच गोष्टींची चाचपणी या बैठकीत केली जाणार आहे. पहिल्या टप्यात 150 बसेस एसटीच्या ताफ्यात येणार असून, त्यापैकी 50 बसेस जुलै महिन्यापर्यंत दाखल होणार आहे. तर उर्वरित 100 बसेस सप्टेंबरपर्यंत येणार असल्याने त्यापूर्वीच एसटी प्रशासनाला इलेक्ट्रिक बसेसचे नियोजन करावे लागणार आहे.
एसटीकडे सध्या सुमारे 14 हजार बसेस असून, त्यामध्ये आता सुमारे 1500 इलेक्ट्रिक बसेस, तर 8 वर्षे वय झालेल्या बसेसचे रुपांतरण करून सीएनजी बसेस सुद्धा प्रवासी सेवा देणार आहेत. त्यामुळे सवलतीच्या दरात एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखद होण्याचा दावा एसटी प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.