Ajit Pawar Tendernama
टेंडर न्यूज

Ajit Pawar : 'त्या' योजनांना तातडीने मान्यता देऊ; अधिकाऱ्यांनो मिशन मोडवर काम करा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील घेरा, सिंहगड आणि प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील बोरी या गावातील पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या गावांना भेट द्यावी. भौगोलिक परिस्थिती आणि शाश्वत जलस्त्रोतांचा अभ्यास करुन सर्वोत्तम व्यवहार्य पर्याय सूचवावा. या गावांची पुढील 50 वर्षांची गरज लक्षात घेऊन पाणीयोजनांचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने पाठवावा. या योजनांचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले.

पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे आणि दूरदृश्यप्रणालीद्वारे पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, नवीन प्रस्ताव तयार करताना धरणातून बंद पाईपद्वारे पाणी आणणे किंवा नवीन साठवण तलाव बांधणे यासारख्या पर्यायांचाही विचार करावा. सध्याच्या अस्तित्वातील साठवण तलावाची दुरुस्ती, अशुद्ध पाणी गुरुत्वनलिका, अशुद्ध पाणी उद्धरणनलिका, पंपिंग मशिनरी, जलशुद्धीकरण केंद्र, अस्तित्वातील जल शुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती, शुद्ध पाणी ऊर्ध्वनलिका, उंच जलकुंभ, संतुलनटाकी, वितरण व्यवस्था, सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक स्त्रोतांचा वापर, तसेच इतर अनुषंगिक कामांचा नव्या योजनेत समावेश करून, अंदाजपत्रकासह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात यावा. या प्रस्तावाचा शासनस्तरावर अभ्यास करुन त्यास तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. जिल्ह्यातील गावांच्या पाणीयोजनांचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बारामती तालुक्यातील मौजे कांबळेश्वर येथील मातीच्या साठवण तलावातून कांबळेश्वर-शिरवली-शिरष्णे-लाटे-माळेवाडी या पाच गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या साठवण तलावाचे बांधकाम जीर्ण झाले असल्याने मोठ्या प्रमाणावर गळती होते. या साठवण तलावाचे बांधकाम नव्याने आणि पक्क्या स्वरुपात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

नगर जिल्ह्यातील ४ गावांच्या नळयोजनांना सुधारित मान्यता -
अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील मौजे भावडी आणि टाकळी लोणार या दोन गावांतील, अकोले तालुक्यातील मौजे माळेगाव आणि कर्जत तालुक्यातील  शिंपोरा या गावातील जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.