मुंबई (Mumbai) : धारावीमधील पात्र रहिवाशांना स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालये असलेले किमान ३५० चौरस फूट आकाराची सदनिका मिळणार आहे, अशी घोषणा अदानी समूह आणि राज्य सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) या विशेष हेतू कंपनीने केली. धारावीतील घराचे हे क्षेत्रफळ मुंबईतील अन्य झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे तब्बल १७ टक्के अधिक आहे.
सर्व धारावीकरांसाठी नवीन सदनिका या स्वप्नातील घरे असतील आणि त्यांचे राहणीमान उंचावतील. धारावीकरांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब प्रत्येक घरात दिसेल. सर्वसामान्य मुंबईकरांच्या भावनांमध्ये ते नेहमीच दिसत असते. धारावी पुनर्वसन प्रकल्पात धारावीचा आत्मा अबाधित राखून ही स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रा. लि.ने (डीआरपीपीएल) म्हटले आहे. पात्र निवासी सदनिका म्हणजे १ जानेवारी २००० च्या आधी अस्तित्वात असलेल्या सदनिका आहेत. प्रत्येक फ्लॅटमध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर आणि स्वतंत्र शौचालय असेल आणि हे फ्लॅट्स सुरक्षित असण्यासोबतच त्यात चांगला उजेड असेल. ते हवेशीर आणि आरोग्यदायी असतील. धारावीची चैतन्यमय आणि वेगळी उद्योजकीय संस्कृती अबाधित ठेवून धारावीचा व्यावसायिक आणि औद्योगिक परिसर म्हणून विकास करण्याचा आणि जागतिक स्तरावर जोडलेले शहर बनवण्याचा डीआरपीपीएलचा प्रयत्न आहे.
धारावीकरांचे जीवनमान उंचावणे, आर्थिक संधी, भविष्य घडविणारे शिक्षण तसेच व्यावसायिक प्रशिक्षण, आधुनिक आरोग्य सुविधा आणि दर्जेदार जीवनशैली हे सारे धारावी आणि नवी धारावी येथे उपलब्ध असेल. त्यांच्यासाठी सामाजिक सभागृहे, मनोरंजन क्षेत्र, सार्वजनिक उद्याने, दवाखाने आणि मुलांसाठी संगोपन केंद्रे देखील असतील. धारावीतील अपात्र निवासी सदनिका धारकांना महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार प्रस्तावित, परवडणाऱ्या भाड्याच्या गृहनिर्माण धोरणांतर्गत निवासस्थान देण्यात येईल. यासाठी, मोठ्या संख्येने झोपड्यांमध्ये असलेल्या रहिवाशांच्या अनेक गरजा लक्षात घेऊन नव धारावीमध्ये, धारावीसारखा विकास करण्यात येईल. डीआरपीपीएलने धारावीचा कायापालट करण्याचे आव्हान स्वीकारले असून या बहुप्रतीक्षित परिवर्तन प्रकल्पासाठी सर्व हिस्सेधारकांकडून मिळणारा पाठिंबा आमच्यासाठी बहुमूल्य आहे. त्यातून सिंगापूर आणि इतर प्रगत राष्ट्रांमध्ये अशा योजनांसाठी ज्या प्रक्रिया पाळल्या जातात त्यांचे सर्वोत्तम पद्धतीने असे पालन करण्यात येईल की, उर्वरित जगासाठी झोपडपट्टी पुनर्वसन आणि शहरी पुनरुज्जीवनाचे नवे मानदंड निश्चित होतील.
'डीआरपीपीएल' म्हणजे काय?
धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) ही अदानी समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून स्थापन केलेली एक विशेष उद्देश कंपनी आहे. धारावीकरांना आधुनिक घरे उपलब्ध करून देऊन आणि त्यांच्या अंगभूत उद्योजकतेची भावना जपतानाच त्यांच्या जीवनात परिवर्तन आणि सुधारणा करण्याचे डीआरपीपीएलचे उद्धिष्ट आहे. मनुष्य केंद्रीभूत ठेवून केले जाणारे हे परिवर्तन मोकळ्या जागेची पुनर्बांधणी आणि नव्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेले सामुदायिक राहणीमान, वाहतूक सुविधा, वीज, पाणी आणि इंटरनेट या अत्याधुनिक अत्यावश्यक बाबींवर आधारित आहे आणि स्वच्छ वातावरण असलेल्या तेथील परिपूर्ण नागरी सुविधा दर्जाचा मानदंड उभा करतील.