Dharavi, Adani Tendernama
टेंडर न्यूज

स्थानिक रहिवाशांचा विरोध झुगारून धारावीत झोपड्यांचे सर्वेक्षण सुरू

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : स्थानिक रहिवाशांचा विरोध झुगारून अखेर सोमवारपासून धारावीत झोपड्यांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. डीआरपीपीएल अर्थात धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडमार्फत माटुंगा पूर्वेला असलेल्या रेल्वेच्या जमिनीवरील कमला रमण नगर येथून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. येत्या सहा ते आठ महिन्यांत धारावीतील सर्वेक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास अदानी समुहामार्फेत करण्यात येणार आहे. परंतु अदानी हा विश्वासार्ह विकासक नाही अशी जनभावना असल्याने अदानीला हाकलून सक्षम विकासकामार्फत अथवा म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यात यावा, सर्व धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे तसेच प्रत्येक झोपडीधारकाला 500 चौरस फुटांचे घर मिळाले पाहिजे, अशा धारावीकरांच्या मागण्या आहेत.

धारावीतील झोपड्यांचे सर्वेक्षण दोन टप्प्यांत होणारआहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक झोपडीला एक युनिक आयडेंटिटी क्रमांक दिला जाणार आहे. त्यानंतर संबंधित गल्लीचे लेसरमॅपिंग (लिडारसर्व्हे) करून नकाशे तयार करण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात घरोघरी जाऊन विशिष्ट अॅपद्वारे रहिवाशांची माहिती गोळा केली जाईल. सध्या घरांना नंबरिंग करण्यासाठी दहाजणांची टीम कार्यरत आहे. येत्या काही दिवसांत सर्वेक्षणासाठी आणखी 15 टीम कार्यरत होतील. प्रत्येक टीममध्ये 4 जणांचा समावेश असणार आहे. सर्वेक्षण पुढे जाईल तसतशी आम्ही टीमची संख्या वाढवू, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने दिली आहे. दरम्यान, येत्या सहा ते आठ महिन्यांत धारावीतील सर्वेक्षण पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. केवळ घरेच नाही तर येथील दुकाने, शाळा, मंदिर, मशिदीचे सर्वेक्षण करून त्यांच्या कागदपत्रांचे डिजीटलायझेशन केले जाईल, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.