मुंबई (Mumbai) : इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी नागपूर येथे सुरु असलेल्या 'महाज्योती' अर्थात महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये (महाज्योती - MAHAJYOTI) कोट्यवधींचा कोचिंग क्लासेस घोटाळा उघडकीस आला आहे. महाराष्ट्रात अनेक नामांकित कोचिंग क्लासेस असताना ओबीसी व्हीजेएनटी विभागाची मात्र पुण्यातील ज्ञानदीप अकादमीवर विशेष मेहेरबानी झाल्याचे दिसून येते. तब्बल १५ ते १८ कोटींचे हे काम टेंडर न काढताच 'ज्ञानदीप'ला देण्यात आले असून या प्रकरणात विभागाच्या मंत्र्यांचे खासगी सचिव प्रशांत खेडेकर यांच्याकडे संशयाची सुई वळली आहे. या सगळ्या प्रकरणात खुद्द मंत्री अतुल सावे (Atul Save) अनभिज्ञ असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणात मोठा गाजावाजा होताच 'ज्ञानदीप' संस्थेवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे मंत्रालयातून खात्रीशीररित्या समजते.
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विभागाअंतर्गत चालणार्या 'महाज्योती'कडून एमपीएससी, यूपीएससीसह, जेईई आणि नीट आदी परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. 'महाज्योती'ने एमपीएससीच्या ऑफलाईन प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसमोर 'ज्ञानदीप' या एकमेव प्रशिक्षण संस्थेचा पर्याय दिला. परीक्षेसाठी २७ वैकल्पिक विषय आहेत. त्यामुळे किमान तीन प्रशिक्षण संस्थांचा पर्याय द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. एकाच संस्थेत दीड हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना गुणवत्तेबाबत तडजोड होते, शिवाय वैकल्पिक विषयांसाठी अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत नाही, आदी शंका विद्यार्थ्यांमध्ये होत्या.
त्याआधी 'महाज्योती'ने एमपीएससी पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी ६ ऑक्टोबरला पत्र काढून 'ज्ञानदीप'मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी व छायांकित प्रती जमा करण्याची सूचना केली. त्यानंतर अचानकपणे १० ऑक्टोबरला परिपत्रक काढून कागदपत्रे जमा करण्यास स्थगिती दिली. तर १४ ऑक्टोबरला पुन्हा नवे परिपत्रक काढून 'ज्ञानदीप'मध्ये १५ ते २७ ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे जमा करावी, अशा सूचना देण्यात आल्या. दुसरी महत्त्वाची बाब राज्यसेवा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी प्रति विद्यार्थी ४६ हजार रुपयाप्रमाणे हे एका वर्षाचे टेंडर फ्रेम केले होते. मात्र एमपीएससीने आपले अभ्यासक्रम यूपीएससी मुख्य परीक्षेच्या धर्तीवर बदलले. त्यामुळे 'ज्ञानदीप'ने विद्यार्थ्यांचे शुल्क वाढविण्याची मागणी महाज्योतीकडे केली. त्यानुसार आता 'ज्ञानदीप'साठी प्रति विद्यार्थी प्रशिक्षण शुल्क ४६ हजारांवरुन १ लाख २६ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचे समजते. त्यापोटी दीड हजार विद्यार्थ्यांसाठी सुमारे १५ ते १८ कोटी खर्च केले जाणार आहेत. राज्यातील इतर नामांकित प्रशिक्षण संस्थांचे राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण शुल्क सुमारे ४५ ते ७५ हजारापर्यंत आहे.
या कामात विभागाचे मंत्री अतुल सावे यांना अंधारात ठेवून त्यांचे खासगी सचिव प्रशांत खेडेकर यांनी परस्पर 'ज्ञानदीप'वर विशेष मेहेरबानी केल्याचे बोलले जाते. खेडेकर हे 'ज्ञानदीप'चे महेश शिंदे यांच्या जवळचे समजले जातात. खेडेकर यांची दोन पुस्तके सुद्धा ज्ञानदीप अकॅडमीने प्रकाशित केली आहेत. दरम्यान, यासंदर्भात विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी यासंदर्भात त्यांना काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट केले. तर मंत्र्यांचे खासगी सचिव प्रशांत खेडेकर यांच्याशी दूरध्वनीवरुन तसेच लघुसंदेशाद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. 'ज्ञानदीप'चे महेश शिंदे म्हणाले, संस्थेने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन हे काम मिळवले आहे. संस्था कोचिंग क्लासेसच्या दर्जाबाबत कुठेही तडजोड करीत नाही, आमच्याबद्दल एकाही विद्यार्थ्याची तक्रार नाही. काही विशिष्ट लोक संस्थेची बदनामी करण्याच्या हेतूने प्रयत्न करीत आहेत.