Aurangabad

 

Tendernama

टेंडर न्यूज

वाहने आणि जाहिरात फलकांच्या कोंडीत अडकले कोट्यवधीचे सायकल ‘ट्रॅक’

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : वेळेची बचत, कमी प्रवासखर्च, व्यायाम आणि पर्यावरणपूरक प्रवास आदी कारणांमुळे औरंगाबादेत सायकल संस्कृती रूजवण्यासाठी महापालिका प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तीककुमार पाण्डेय हे सायकल ट्रॅक निर्मितीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांच्या डोळ्यावर पट्टी ठेवत औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (एएससीडीसीएल) अधिकारी आणि नाशिकच्या पुरवठाधारक स्वान इलेक्ट्रो मॅकचा अजय बुर्हांडे याच्या आर्थिक समीकरणामुळे सायकल ट्रॅक निर्मितीत गोंधळ झाला आहे. विशेषतः हे सायकल ट्रॅकच वाहने आणि जाहिरात फलक तसेच कचरा कोंडीत सापडले आहेत.

२०२० मध्ये एएससीडीसीएलच्या व्यवस्थापनाने ई टेंडरला फाटा देत जेम पोर्टलवर टेंडर प्रक्रियेद्वारे नाशिकच्या स्वान इलेक्ट्रो मॅक कंपनीसोबत सामंजस्य करार करून प्रति युनिट ७९८ रूपये दराने ३० हजार बोलार्ड्स (पाॅली युनिथान रबराचे एक फुटाचे खांब ) खरेदी केले. त्याचा वापर करत क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या अडीच किमी अंतरात शहरात पहिला सायकल ट्रॅक तयार करण्यात आला होता.

उद्घाटनानंतर प्रतिसाद नाही

मात्र २६ जानेवारी २०२० रोजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर अद्याप एकाही व्यक्तिने या सायकल ट्रॅकचा लाभ घेतला नाही. असे असताना महापालिका प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तीककुमार पाण्डेय यांनी सलीम अली सरोवर ते विभागीय आयुक्त यांचे निवासस्थान, सिडकोतील प्रियदर्शनी उद्यान ते एमजीएम, कॅनाट परिसर, सेव्हनहिल ते टिव्हीसेंटर व अन्य मार्गावर असे सायकल ट्रॅक निर्मिती केल्यास औरंगाबादकरांचा प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करत सायकल ट्रॅकची निर्मिती केली. मात्र आता हे सायकल ट्रॅकच वाहन आणि व्यावसायिकांच्या हातगाड्या आणि जाहिरात फलकांच्या कोंडीत अडकलेले आहेत.

ट्रॅक मोडीत ; वाहने पार्क

औरंगाबादेत सायकल संस्कृती रूजावी यासाठी वर्षभरापूर्वी एएससीडीसीएलच्या अधिकाऱ्यांनी बेभाव बोलार्ड्स खरेदी करून २४ कोटी खर्चून सायकल ट्रॅक तयार केलेत. परंतु उद्घाटनाच्या दिवशी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व मान्यवरांनी सायकलवरून मारलेली फेरी शेवटची ठरली. त्यानंतर या ट्रॅकमुळे वाहने रस्त्यावर येऊन निम्मे रस्ते वाहनांनी गिळंकृत केल्याने परिणामी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोकांनी हे ट्रॅक मोडीत काढले. जागोजागी मोडीत काढलेल्या ट्रॅकच्या खुणा येथे दिसून येतात. आता त्या जागेवर वाहने पार्क होतात.

नको तिथे बसवण्याचा घाट

अर्थातच एएससीडीसीएलचा औरंगाबादेत ट्रॅकचा प्रयोग फसल्यानंतर स्वाॅन इलेक्ट्रो मॅक कंपनीसह स्वतःची तुंबडी भरण्यासाठी अर्थात कंपनीने केलेला बेभाव बोलार्ड्सचा पुरवठा खपवण्यासाठी शहरात पुन्हा २० किलोमीटर सुरक्षित आणि वापरकर्त्यांसाठी सायकल ट्रॅक आणि पादचारी मार्ग तयार करण्यासाठी रस्त्यांची शोधाशोध सुरू केलीय. आणि नको तिथे शहरात सायकल सेवा सुरू करण्याच्या नावाखाली बोलार्ड्स रोवण्याचा घाट घातला आहे.

आता लढवली अशी शक्कल

ट्रॅकचा प्रयोग वाहने आणि जाहिरात फलकात अडकल्यानंतर एएससीडीसीएलच्या अधिकार्यांनी आता वाहतूक शाखेची मागणी असे म्हणत पादचाऱ्यांसाठी सुरक्षित डावे-उजवे वळणे तयार करणे, शहरातील मुख्य रस्त्यांवर जंक्शनवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी, गर्दी असलेल्या भागात अव्यवस्थित पार्कींग सुव्यवस्थित करणे, वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रिक्षा स्टॅन्डसाठी स्वतंत्र जागा तयार करण्याची अशी विविध कारणे दाखवत आता नको तिथे लोकांचा विरोध असतानाही बोलार्ड्स ठोकण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे विद्यापीठ हे स्वतंत्र प्राधिकरण असताना तेथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाला तब्बल दोन हजार बोलार्ड्स देण्याचा पराक्रम एएससीडीसीएलच्या अधिकाऱ्यांनी केला.

याचे उत्तर यंत्रणेकडे नाही

औरंगाबादेत सायकल ट्रॅक उभारण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी शहरात नेमके किती सायकलिस्ट आहेत, या सेवेमुळे नेमके किती नागरिक सायकल सेवेकडे वळतील अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या एएससीडीसीएलच्या यंत्रणेकडे नाहीत.

आधी सायकल संस्कृती रूजवा

'मुळात औरंगाबादेत आता सायकल संस्कृती नाही. त्यामुळे आपल्या शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सायकलला प्राधान्य दिलेले दिसत नाही. त्यामुळे पहिली सायकल संस्कृती रूजवावी लागेल. ती रूजवण्यासाठी सर्वोत्तम दर्जाचे सायकल ट्रॅक तयार करायला हवेत. ते तयार करताना सामान्य औरंगाबादकरांना या सेवेत नेमका किती रस आहे, त्याबाबत जनजागृती नसल्यास ती निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, ती सेवा कुठे सुरू केल्यास त्यास उत्तम प्रतिसाद मिळेल? या सर्व बाजूंचा विचार व्हायला हवा.

- संजय सिरसाट, आमदार

आधीच शहरातील रस्ते अरूंद आहेत. विकास आराखड्यात गुंतलेल्या रस्त्यांचे आधी रूंदीकरण करा त्यानंतरच हे ट्रॅक अधिक फायद्याचे ठरतील.

- मनोज बंन्लीलाल गांगवे, माजी शहर सुधार सभापती

सायकल ट्रॅक तयार करताना कुठलेही नियोजन संबंधित यंत्रणांनी केले नाही. या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थां, वाहतूक तज्ज्ञ यांच्यासोबत असे प्रकल्प शेअर करायला हवेत. यासाठी संबंधित संस्था तसेच परिवहन, वाहतूक, पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी यंत्रणांचे आयुक्त व वरिष्ठ अधिकारी यांची एकत्रित बैठक व्हायला हवी. तरच औरंगाबादेत सायकल ट्रॅकचा प्रयोग यशस्वी ठरेल.'

- राहुल इंगळे, समाजसेवक