मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडची वाटचाल अवघ्या महिनाभरातच धोकादायक अवस्थेकडे सुरु झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कोस्टल रोडला कनेक्ट असलेल्या भुयारी मार्गात अर्थात अंडरपासमध्ये लाटांचे पाणी शिरले होते. यामुळे हा भुयारी मार्ग बंद ठेवण्यात आला होता. तर आता कोस्टल रोडला तडे गेल्याचेही निदर्शनास येत आहे. अवघ्या एक महिन्यापूर्वी उट्घाटन केलेल्या कोस्टल रोडच्या काँक्रीट रोडवर भेगा पडल्या आहेत. मरिन ड्राईव्हच्या एक्झिट रॅम्पवर या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कोस्टल रोड कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कोस्टल रोडला कनेक्ट भुयारी मार्ग बनवण्यात आला आहे. या भुयारी मार्गातूनच कोस्टल रोडजवळ समुद्रात असलेल्या हाजीअली दर्ग्यापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. मात्र, समुद्रात मोठी भरती आल्यामुळे लाटांचे पाणी अंडरपासमध्ये शिरले. यामुळे अंडरपास बंद करण्यात आला. परिणामी हाजी अली दर्ग्याचे दर्शन देखील बंद झाले. हाजी अली दर्गा येथे दर्शनासाठी नेहमीच लोकांची गर्दी असते. सध्या हा भुयारी मार्गच हाजी अली दर्गा पर्यंत जाण्याचा मार्ग आहे. मात्र, भुयारी मार्गात लांटांचे पाणी शिरल्याने हा मार्ग बंद करण्यात आला. भुयारी मार्गाजवळ भरती आल्यास अतिरीक्त पाण्याचा निचरा होईल अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही असा आरोप हाजीअली दर्गा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
कोस्टल रोडचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वरळी ते मरीन लाईन्सपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कोस्टल रोडमुळे मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर केवळ आठ मिनिटात पार करता येत आहे. कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह असा 9 किलोमीटरचा हा कोस्टल रोड आहे. या चारपदरी मार्गावर ताशी 80 ते 100 किमी अशी वेग मर्यादा ठेवण्यात आली आहे. कोस्टल रोडवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त आहे. रोडवर एन्ट्री, एक्झिट, बोगद्यासह 24 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. भुयारी मार्गावर प्रत्येक 100 मीटरवर पब्लिक अॅड्रेस स्पिकर बसवण्यात आलेत. मुंबईला वेगवान करणारा हा प्रकल्प आहे. सुमारे 14 हजार कोटी रुपये खर्चाच्या 10.58 कि.मी. लांबीच्या या रस्त्यावर दोन्ही बाजूला प्रत्येकी चार मार्गिका असतील. तर बोगद्यांमध्ये ती दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन असेल. उर्वरित काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने वरळी ते मरीन ड्राईव्ह या मार्गिकेवर सध्या सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत टोलमुक्त प्रवास करता येतो. या प्रकल्पाला ‘धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण)’ असे नाव देण्यात आले आहे.