Pune

 

Tendernama

टेंडर न्यूज

पुण्यात वर्क ऑर्डर मिळण्यापूर्वीच ठेकेदाराचे काम सुरू

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सिंहगड रस्त्यावर (Singhgad Road) नागरिक आधीच वाहतूक कोंडीने बेजार आहेत, त्यात आता राजाराम पूल येथे पादचारी मार्गावर तब्बल ७८ लाख रुपये खर्च करून नरवीर तानाजी मालुसरे यांचे शिल्प उभारले जाणार आहे. धक्कादायक म्हणजे कामाची वर्क ऑर्डर देण्यापूर्वीच ठेकेदाराने काम सुरू केले. तसेच, या शिल्पास कला संचालनालयाची मान्यता मिळालेली नाही.

सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्यावरील पादचारी मार्ग, सायकल मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. त्यातच आता या रस्‍त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू झाले, हे काम पुढील किमान तीन वर्ष चालणार आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध झालेले नसल्याने या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

राजाराम पुलाच्या चौकात सिंहगड रस्त्यावर पादचारी मार्गावर हे ७० फूट लांब आणि सुमारे ३० फूट उंचीचे तानाजी मालुसरे यांचा जीवन प्रसंग दाखविणारे सात शिल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी जीएसटीसह ७८ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. शुभम कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने वर्क ऑर्डर मिळण्यापूर्वीच गेल्या आठवड्यापासून काम सुरू केले आहे. पादचारी मार्ग खोदून रस्त्याच्या बाजूने हिरव्या रंगाचे कापड लावून आतमध्ये काम सुरू केले आहे. हे शिल्प योग्य आहे की नाही हे तपासून परवानगी दिली जाते, पण कला संचालनालयाने त्याची तपासणी केलेली नाही. नगरसेवक श्रीकांत जगताप म्हणाले, ‘‘कला संचालनालयाची मान्यता आणि वर्क ऑर्डर मिळेल, पण हे काम त्याच ठेकेदाराला मिळाल्याने काम सुरू केले आहे. या कामामुळे पादचाऱ्यांना कोणताही अडथळा होणार नाही. याउलट शिल्पामुळे नव्या पिढीला इतिहास कळेल.’’

‘‘तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील शिल्प करण्यास स्थायी समितीची मान्यता मिळाली आहे, पण अद्याप वर्क ऑर्डर दिलेली नाही. कला संचालनालयाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला आहे. याठिकाणी पादचाऱ्यांसाठी दोन मीटर जागा ठेवली आहे.’’

- अमर शिंदे, कार्यकारी अभियंता

टेंडरनामाच्या फेसबुक पेजला लाईक करा - https://www.facebook.com/tendernama

टेंडरनामाच्या ट्विटर पेजला फॉलो करा - https://twitter.com/tendernama

टेंडरनामाच्या इन्टाग्राम पेजला फॉलो करा - https://www.instagram.com/tendernama