पुणे - महापालिकेने वाहनतळ बांधून ते चालविण्यासाठी दिले आहेत. यातून महापालिकेला नियमित उत्पन्न मिळेल अशी आशा होती. मात्र, या ठेकेदारांनी पालिकेकडे भाडे भरण्यास ठेंगा दाखवलेला आहे. ३० पैकी १६ ठेकेदारांकडून ५ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला; पण शिरजोर झालेल्या ठेकेदारांकडून पालिकेला दादच दिली जात नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे.
नागरिकांना पार्किंगसाठी जागा मिळावी, यासाठी विकास आराखड्यात शहराच्या विविध भागांत आरक्षण टाकण्यात आले. या जागा ताब्यात घेऊन कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने बहुमजली वाहनतळ उभारले. हे वाहनतळ ठेकेदारांच्या माध्यमातून चालविण्यास दिल्यानंतर यातून महापालिकेला उत्पन्न मिळेल व नागरिकांना सशुल्क पार्किंग मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली. महापालिकेने शहरात ३० वाहनतळ बांधले असून, ते ठेकेदारांना चालविण्यास दिले आहेत.
त्यांच्याकडून दरमहिन्याला ठरलेले भाडे जमा होणे आवश्यक होते. मात्र यातील बहुतांश वाहनतळांची मुदत संपल्याने केवळ मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिकेच्या वाहनतळ व्यवस्थापनाचे काम यापूर्वी मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे होते; पण काही महिन्यांपूर्वी हे काम वाहतूक नियोजन विभागाकडे देण्यात आले आहे.
काही ठेकेदारांकडून वार्षिक भाडे स्वीकारले जाते, तर काहींकडून प्रत्येक महिन्याला. मार्च २०२० ला लॉकडाउन जाहीर झाला तेव्हापर्यंत काही ठेकेदारांकडून दर महिन्याला पैसे भरले जात होते. मार्च २०२० ते सप्टेंबर २०२० या काळात वाहनतळ बंद होते. कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यानंतर वाहनतळ पुन्हा सुरू झाले, नागरिकांकडून सशुल्क पार्किंगचा लाभ घेण्यास सुरवात केली.
३० पैकी १६ वाहनतळाच्या ठेकेदारांनी थकबाकी भरण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. ३१ मार्च २०२० रोजी या १६ ठेकेदारांची थकबाकी १ कोटी ८३ लाख ४४ हजार ४२५ रुपये इतकी होती. मात्र आता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत हा आकडा ५ कोटी ३९ लाख ६४ हजार २०३ रुपये इतका झाला आहे. वाहनतळांची थकबाकी भरावी, यासाठी प्रशासनाने पाठपुरावा केला तरी त्यास प्रतिसाद मिळत नाही. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आता ठेकेदारांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे. तसेच कायदेशीर नोटीस बजावून न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत.
अशी आहे थकबाकी...
वाहनतळ थकीत रक्कम
सतीशशेठ मिसाळ वाहनतळ - ४७.३६ लाख
नारायण पेठ - ९.३ लाख
हमालवाडा नारायण पेठ - १०२.४३ लाख
पेशवे पार्क - १०.६१ लाख
हरिभाऊ साने वाहनतळ - २.२२ लाख
सारसबाग - १८.८९ लाख
हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ (आर्यन) - ७८.४५ लाख
तुकाराम शिंदे वाहनतळ, पुणे स्टेशन (दुचाकी) - १६५.६८ लाख
महात्मा गांधी उद्यान, बंडगार्डन - १.८२ लाख
डिसिजन टॉवर, बिबवेवाडी - ४३ हजार ७५०
साईबाबा मंदिर, गुलटेकडी - ८.४२ लाख
पीएमटी टर्निनल, कात्रज डेअरी जवळ - १.२० लाख
शिवाजीनगर सर्व्हे क्रमांक १२१६/१ - १४.२ लाख
भांबुर्डा फायनल प्लॉट ५७६ - ३५.२ लाख
मिलेनियम प्लाझा शिरोळे रस्ता - ८.६७ लाख
प्लॉट क्रमांक ६६० जंगली महाराज रस्ता - २५.२९ लाख
‘माननीयां’चे उभय
वाहनतळाचे ठेकेदार हे महापालिकेच्या नगरसेवकांचे निकटवर्तीय आहेत. महापालिकेकडून कारवाई सुरू झाली की ‘माननीयां’चा दबाव येण्यास सुरुवात होते. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचेही एका कर्मचाऱ्याने सांगितले.