Toll

 

Tendernama

टेंडर न्यूज

इम्पॅक्ट : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोलधाडीवर शिक्कामोर्तब

कंत्राटदार, एमएसआरडीसीची भ्रष्ट युती

मारुती कंदले

मुंबई (Mumbai) : टोलवसुलीसाठी चर्चेत असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसच्या (Mumbai-Pune Express Way) वसुली कंत्राटदारांने अजब युक्तिवाद करुन खळबळ उडवून दिली आहे. कंत्राटदारांच्या मते, या महामार्गावरुन दररोज तब्बल दहा हजारांहून अधिक वाहने टोल न देता प्रवास करतात. टोल न देता पुढे जाणाऱ्या वाहनधारकांवर अक्षरश: गुंडगिरीचा अवलंब करणाऱ्या या कंत्राटदाराचा हा युक्तिवाद पाहून त्यांच्या धाडसाचे कौतुकच करावे लागेल. विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या (एमएसआरडीसी) वेबसाईटवर ही आकडेवारी जाहीर झाली आहे. यातून कंत्राटदार आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

टेंडरनामाने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील ही लूट पुराव्यांसह उघडकीस आणली होती, त्याला खुद्द एमएसआरडीसीने पुष्टी दिली आहे. नुकतीच द्रुतगती महामार्गावरील डिसेंबर 2021 ची आकडेवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून रोज दहा हजारहून अधिक वाहने टोल न देता या महामार्गावरुन प्रवास करत असल्याचे दिसून येते. ज्यांना टोलमधून सुट आहे अशी आमदार, खासदार, पोलिस, रुग्णवाहिका, लष्करी वाहने अशी दररोज दहा हजारहून अधिक वाहने एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करत असतील अशी शक्यता नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून देण्यात आलेली ही आकडेवारी संशयास्पद आहे.

यासंदर्भात पुण्यातील सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. वेलणकर मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात की, २०१६ साली मी मुख्य माहिती आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीवरुन मुख्य माहिती आयुक्तांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यातील सर्व टोल नाक्यांवरुन रोज किती व कोणत्या प्रकारची वाहने जातात ती संख्या व टोलची रक्कम याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. नुकतीच द्रुतगती महामार्गावरील डिसेंबर २०२१ महिन्याची आकडेवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून रोज दहा हजारांहून अधिक वाहने टोल न देता या महामार्गावरुन प्रवास करत असल्याचे दिसून येते. डिसेंबर २०२१ या पूर्ण महिन्यात एकूण ३,३०,७९७ वाहनांनी टोल न भरता या महामार्गावरून प्रवास केला. यात ज्यांना सूट आहे अशी वाहने आणि टोल चुकवून जाणारी वाहने अशा दोन कॅटेगरी मधील वाहने असल्याचे म्हटले गेले आहे. मात्र यातील तपशील मात्र जाणीवपूर्वक प्रसिद्ध केलेला नाही असा संशय येतो.

मुळातच रोज दहा हजारांहून अधिक रुग्णवाहिका, पोलिस / मिलिटरी वाहने, आमदार / खासदार वगैरे या रस्त्यावर प्रवास करत असतील ही शक्यता शून्य आहे. आणि त्यातही १८५० बसेस, ५१९३ ट्रक, ५०८६ मल्टीऍक्सल, २०१९६ एलसीव्ही ही सवलतधारक वाहनांमध्ये असू शकत नाहीत. याचाच अर्थ रोज काही हजार वाहने टोल चुकवून जातात. हे केवळ अशक्य आहे. त्यामुळे हे सगळंच संशयास्पद वाटते. मात्र कंत्राटदाराकडून आलेली ही आकडेवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करताना तेथील आधिकार्यांना यात काही वावगं वाटत नाही हे आहे.

त्यामुळे आपणास विनंती की यापुढे ज्यांना सूट आहे अशी वाहने आणि टोल चुकवून जाणारी वाहने यांचे आकडे स्वतंत्र प्रसिद्ध करावयाचे आदेश कंत्राटदाराला द्यावेत तसेच टोल चुकवून वाहने जाण्याच्या संशयास्पद प्रकाराला जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांची चौकशी करावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.