Jalna Road Tendernama
टेंडर न्यूज

भाग १ : औरंगाबादकरांच्या जिव्हाळ्याच्या जालना रोडची निकृष्ट व्यथा

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील प्रमुख आणि सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या असलेल्या जालना रस्त्याच्या (Jalna Road) कामाबाबतची वर्कऑर्डर एकाला दिली अन् काम पाच सबठेकेदारांना (Contractor) दिल्याचे टेंडरनामाच्या इन्व्हेस्टिगेशनमधून समोर आले आहे. तसेच या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट करण्यात आले असून, एनएचएआयच्या (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) अभियंत्यांना इतर कामांचा व्याप, पीएमसीचे दुर्लक्ष यामुळे या कामाची वाट लागली आहे. या कामामुळे ठेकेदार मात्र मालामाल झाले असून, सबठेकेदारांची दिवाळी जणू काही दिवाळीच झाली आहे. या सर्व कामात मात्र औरंगाबादच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी झाल्याचे स्पष्ट दिसते.

जालनारोडवरील ७४ कोटीच्या कामांचे पार वाटोळे

एनएचएआयमार्फत कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या गटाराचे तसेच पॅव्हरब्लाॅकचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे समोर आले आहे. दर्जा न तपासता थेट हे काम सुरु असल्याचा आरोप औरंगाबादकर करत आहेत. जालना रोडवरील कॅम्ब्रीज चौक ते नगर नाक्यापर्यंत या गटाराचे तसेच रस्त्याची रूंदी वाढवत त्यावर पादचाऱ्यांसाठी पॅव्हरब्लाॅकचा फुटपाथ तसेच तीन ठिकाणी लोख॔डी ओव्हर ब्रीज तयार करण्याचे काम सुरु असून याकडे एनएचएआयचा एकही अभियंता अजूनपर्यंत फिरकलेला नसल्याची खंत औरंगाबादकर व्यक्त करताना दिसत आहेत. दुसरीकडे या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता आम्हाला एकच काम नाही, अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत, यासाठी पीएमसीची नेमणूक केली आहे, ते वेळोवेळी बांधकाम साहित्याची तपासणी करून आम्हाला अहवाल पाठवतात त्यात कुठेही निकृष्ट दर्जाचे काम होत नसल्याचे या विभागाचे म्हणणे आहे.

गडकरींची १५० कोटीची घोषणा, प्रत्यक्षात पदरी ७४ कोटी ८८ लाख

औरंगाबाद शहराची जीवनवाहिनी असलेल्या जालना रस्ता विस्तारीकरणासाठी केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी १ जून २०१८ ला दीडशे कोटींची योजना तयार केल्याची घोषणा केली होती. त्यात जालना रस्त्याचे सहापदरीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याचा विकास आराखडा देखील एनएचएआयकडे सादर केल्याचे ते म्हणाले होते. २०१८ पर्यंत कामाची टेंडर निघतील असे आश्वासन देखील दिले होते. मात्र केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी तरतूद न झाल्यामुळे १५० कोटी ऐवजी ७४ कोटी ८८ लाख रूपयांना केंद्र शासनाने मंजुरी दिली.

या कामांचा समावेश

कॅम्ब्रीज चौक ते एअरपोर्ट तसेच नगरनाका ते महावीर चौक रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, कॅम्ब्रीज चौक ते नगरनाका या १४.५ किमी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुने आरसीसी गटार आणि रस्त्याच्या उर्वरित शोल्डरमध्ये पादचार्यांसाठी साडेतीन मीटरचा फुटपाथ व मुकुंदवाडी, आकाशवाणी तसेच जिल्हा न्यायालयासमोर पादचार्यांसाठी लोखंडी ओव्हर ब्रीज तसेच चिकलठाणा जिल्हा रूग्णालय ते एअरपोर्ट ओव्हरब्रीज आदी कामांचा समावेश आहे. या कामांसाठी हैद्राबाद येथील सृष्टी काॅन्टेच प्रा.लि.या कंपनीची नेमणूक करण्यात आली. मंजुर झालेल्या ७४ कोटी ८८ लाखातून २.२१ कमी दराने त्याने टेंडर मान्य केल्याने ७३ कोटी २० लाख ४९ हजारात त्याला कामाचा ठेका देण्यात आला. त्याची रितसर वर्कऑर्डर दिनांक १३ नोव्हेंबर २०१९ रोजी देण्यात आली होती.

वर्क ऑर्डर एकाची कामे मात्र सबठेकेदारांना

या कामाचा ठेका घेतलेल्या सृष्टी काॅन्टेच प्रा.लि. कंपनीने राजवीर, साईश्रध्दा, कल्पेश आणि ब्लुलेडर आदी चार कंपनींच्या सब ठेकेदारांना परसपर वर्क ऑर्डर देऊन कामे वाटून दिली आणि या कंपन्यांकडून कामे करून घेत आहे. या कामाचा ठेका घेतलेल्या सब ठेकेदारांनी ही कामे घेताना प्रमुख कंपनीला दर्जेदार कामे करून देण्याचे आश्वासन देऊन कामाच्या वर्क ऑर्डरही घेतल्या; मात्र, प्रत्यक्षात कामे निकृष्ट दर्जाची होत असल्यामुळे केंद्र शासनाच्या ७४ कोटी ८८ लाखाच्या कामांवर माती फिरली. त्यामुळे औरंगाबादकरांवर आगीतून फोफाट्यात येण्याची वेळ आली आहे.

मुळ ठेकेदारावर कारवाई करावी

वर्कऑर्डर घेऊनही स्वतः काम न करता उंटावरून शेळ्या हाकत कोट्यावधीचा मलीदा खाणाऱ्या या सृष्टी काॅन्टेच प्रा.लि. या कंपनीवर कारवाई करावी. तसेच सब ठेकेदारांना कशाच्या आधारे कामे दिली याची चौकशी व्हावी अशी मागणी औरंगाबादकर करत आहेत.

टेंडरनामाने केली १४ किमी पाहणी...

- औरंगाबादकरांच्या तक्रारीनंतर कॅम्ब्रीज चौक ते नगरनाका या १४.५ किमी अंतरावरील कामांची पाहणी केली असता. कॅम्ब्रीज चौक ते एअरपोर्ट तसेच नगरनाका ते महावीर चौक दरम्यान केलेल्या डांबरीकरणाची वाट लागलेली आहे. त्याचा पुरावा म्हणजे पहिल्याच पावसात उखडलेल्या कामावर पॅचवर्कची उंचवट्यांची लिपापोती केलेली दिसली.

- नगरनाका ते महावीर चौक, महावीर चौक ते जिल्हा न्यायालय, जिल्हान्यायालय ते क्रांतीचौक ते अमरप्रीत ते मोंढानाका ते आकाशवाणी ते सेव्हनहील ते उच्च न्यायालय दरम्यान कुठे एक ते दिडमीटर पर्यंत झेब्राक्राॅसींग गटारीचे काम झालेले दिसले. त्यावर काही भागात पॅव्हरब्लाॅक तर काही भागात मातीचे ढिग पसरलेले दिसले.

- या गटाराच्या भिंती बांधताना भिंती उभारण्यासाठी ठेवलेले साहित्य २१ दिवसांच्या आत काढल्यामुळे भिंतीच्या मजबुतीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे

या कामाचा स्पाॅटपंचनामा करत असताना एअरपोर्टसमोर तसेच चिकलठाणा आठवडी बाजार समोर जालना रस्त्याच्या बाजूला गटाराचे हे काम सुरु असताना कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कामासाठी वापरलेले साहित्य उत्तम दर्जाचे नसल्याचे दिसून येत आहे. याचबरोबरीने अंदाज पत्रकाप्रमाणे कोणतेही काम येथे सुरु असल्याचे दिसून येत नाही. याउलट सरसकट लोखंडी सळ्यांची बांधणी करून त्यात काँक्रीट टाकले जात असल्याचे दिसले. हे काम सुरु असताना एनएचएआयचे आणि पीएमसीचे अधिकारी या ठिकाणी दिसले नाहीत. वापरण्यात येत असलेले काँक्रीट उत्कृष्ट दर्जाचे असेल का याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

- या कामावर देखरेख करण्यासाठी जयपूरची सीईजी (कंन्सलटींग इंजीनियरिंग गृप) या कंपनीची पीएमसी (प्रकल्प सल्लागार समिती) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी जवळपास एक कोटी १६ लाख रुपये त्यांना मोजून दिले आहेत, असे असताना सदर कंपनीचे अधिकारीही या कामाकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.

निकृष्ट पेव्हर ब्लॉक मजबुतीसाठी मातीमिश्रित खडीचा थर

कॅम्ब्रीज चौक ते नगरनाका या १४.५ किमीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुने आराखड्यात साडेतीन मीटरचे पेव्हर ब्लॉक बसविने असा उल्लेख असताना जिथे जागा मिळेल तिथे जेसीबीच्या दात्यांनी जमीन कुरतडत ते बसवण्यात धन्यता मानत या कामाची किंमत वसूल करत सब ठेकेदाराची किंमत वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सतत वर्दळ असलेल्या या रस्त्यावर बसविण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकचे काम सुरुवातीपासून निकृष्ट असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. पेव्हर ब्लॉकची बांधणी घट्ट करण्यासाठी त्यावर केलेली काॅक्रीटची लाॅकींग अनेक ठिकाणी उखडल्याने पॅव्हरब्लाॅकचे अनेक भागात तूकडे पडल्याचे दिसले.पेव्हरब्लाॅकच्या सर्वात खालच्या बेडलेअरवर चक्क माती ओतण्याचा विचित्र प्रयोग केल्याने औरंगाबादकर संताप व्यक्त करत आहेत.

जालनारोड बाराही महिने पादचाऱ्यांनी गजबजलेला असतो. यावर रिक्षा, दुचाकांची सतत वर्दळ असते. या वर्दळीच्या रस्त्याच्य दुतर्फा फुटपाथ तयार करण्यात येणार असल्याने पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निकृष्ट उद्योग सुरू केला आणि पादचाऱ्यांची डोकेदुखी वाढविली आहे. पेव्हर ब्लॉक ८० एमएम डायमीटरचे बसवल्याने पादचाऱ्यांसाठी तयार केलेल्या या फुटपाथवर सर्वत्र वाहनांनी कब्जा केल्याने नेमका हा कोट्यावधीचा फुटपाथ कोणासाठी असा प्रश्न औरंगाबादकर आता विचारत आहेत. शिवाय ठिकठिकाणी नक्षीदार फुटपाथ तयार करण्याचे शिक्षण या अभियंत्यांनी कोणत्या विद्यापीठातून घेतले आहे, हा देखील संशोधनाचा विषय आहे. ही करदात्या जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आहे, असे चर्चेचे पीक शहरात पसरलेले आहे. या पेव्हर ब्लॉकमध्ये फटी असल्याने तेथे कचरा अडकून बसलाय तर दुसरीकडे माती आणि चिखल झालेला दिसत आहे.. सफाई करताना तो कचरा बाहेर येत नाही. तर अनेक भागात या नवा कोऱ्या फुटपाथवर कचरा साचून घाणीचे दर्शन होत आहे. मातीचे ढिग तसेच पडुन आहेत. शिवाय यावर डांबरी रस्ता देखील ओरबाडण्यात आला आहे.

लोकार्पणाआधीच स्कायवाॅकचा 'कचरा'

याच निधीतून मार्गावर तीन ठिकाणी ३० कोटीचे स्काॅय वाॅकचा समावेश करण्यात आला आहे. यात जिल्हा न्यायालयासमोर गत वर्षीच नागपूरच्या रोहनशेठ यांच्या ब्लुलेडर कंपनीमार्फत नव्याने बांधलेला स्कायवाॅकवर जराही पाऊल टाकताच त्यावर व्हायब्रेशनने हादरे बसतात. शिवाय लोकार्पणाआधीच तो बॅन्ड झाल्याचे दिसून आले आहे. शिवाय पायऱ्यांचे जाॅईंट देखील निखळलेले आहेत. चुकीच्या ठिकाणी पण तसा फार ऊपयोगी नसणारा स्कायवाॅक व त्याच्या आधाराने जमा झालेले बेकायदेशीर फेरीवाले यांनी रस्त्या जणू गिळकृत केला आहे. पदचाऱ्यांना चालण्यासाठीचा हा स्काॅय वाॅकवर सर्वत्र कचरा आणि त्यात भिकाऱ्यांनी निवास केल्याने तो अडचणीचा व त्रासाचा झाला आहे. तर दुसरीकडे आकाशवाणी चौकात देखील चुकीची जागा निवडल्याने प्रकरण न्यायालयात गेल्याने खिळ बसली आहे. जिल्हा न्यायालयासमोर निकृष्ट स्काॅय वाॅक तयार केल्याने सदर नागपूरच्या रोहनशेठ यांच्या ब्लुलेडर कंपनीचा ठेका रद्द करून आता मुकुंवाडीतील स्काॅय वाॅक तयार करण्याचे काम आता मुंबईतील निलेश आर्के यांच्या साईश्रध्दा इंजिनियरींग कंपनीला देण्यात आसे आहे. मात्र येथेही जागेची निवड चुकली आहे.

तीन वर्षात ५८ टक्के काम ३० कोटी अदा

टेंडरनामा प्रतिनिधीने या सर्व कामांचा आढावा घेतला असता तीन वर्षात केवळ ५८ टक्के काम झाल्याचे दिसले. त्यात एअरपोर्ट समोरील मातोश्री लाॅन ते जिल्हा रूग्णालय असे १२१० मीटरच्या फ्लाॅय ओव्हर ब्रीजचे काम अद्याप सुरू नसल्याचे दिसले. अनेक ठिकाणी साईड ड्रेन आणि फुटपाथचे काम देखील बाकी असल्याचे दिसत आहे. त्यातही निकृष्ट कामाचा देखावा मांडणार्या या ठेकेदाराला ३० कोटी रूपये दिल्याचे तपासणी केली असता समोर आले आहे.

दर्जाहीन काम; यंत्रणा पाठीशी

दर्जाहीन काम सुरू असल्याचे टेंडरनामाने निदर्शनास आणून दिल्यानंतर एनएचएआयचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी या बाबींकडे दुर्लक्ष करत ठेकेदार पीएमसीने दिलेल्या डीपीआर प्रमाणेच काम करत आहे, कामात कुठेही हलगर्जीपणा नाही, पीएमसी देखील वेळोवेळी कामाची तपासणी करून अहवाल पाठवत आहे. हीच कहाणी अधीक्षक अभियंता एम. बी. पाटील यांच्यासह पीएमसीचे नरेंद्र पार्थसारथी यांनी तसेच सृष्टी काॅन्टेच प्रा.लि.चे श्री अभिषेक यांनी एकाच सुरात मांडली आहे.त्यामुळे यंत्रणाच पाठीशी असल्यावर कारवाई कुणावर करणार असा प्रश्न औरंगाबादकरांना पडला आहे.