road Tendernama
टेंडर न्यूज

'टेंडरनामा' ग्राउंडरिपोर्ट; रस्ता उखडलेला अन् ठेकेदाराचे हात वर

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : टेंडरमधील (Tender) अनेक कामांना फाटा देत, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निकृष्ट दर्जाचा रस्ता (Road) केल्याचे 'टेंडरनामा'च्या पाहणीतून दिसून आले आहे. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही औरंगाबाद जिल्ह्यातील परदरी (Pardari) गावात रस्त्याचे काम मुदतीनंतरही प्रत्यक्षात काम पूर्ण झालेले नाही. तरीही बेजबाबदार ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याऐवजी निव्वल नोटीस देऊन सोपस्कार पूर्ण केल्याचे अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे. तर, निधीच नाही तर काम कसे होईल, असा प्रश्न ठेकेदाराकडून उपस्थित होत आहे.

राज्याच्या ग्रामविकास खात्यांतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून येथील जिल्हा मार्गापासून परदरी गावापर्यंत साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याच्या बांधणीला ६ सप्टेंबर २०१८ मध्ये मंजुरी दिली. या कामासाठी १ कोटी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले. टेंडरप्रमाणे हे काम काम २ सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र, २०२२ उजाडण्याची वेळ होत आली. तरीही रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले दिसत नाही. यंत्रणा आणि ठेकेदाराच्या वादात मात्र ग्रामस्थांचे हाल होत आहेत.

या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २०१८ मध्ये निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, दोन वर्षानंतरही या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून, दोन वर्षे देखील होत नाहीत; तोच रस्त्याचे केलेले खडीकरण आणि मजबुतीकरण उखडून त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. कामाचा दर्जा नसल्याने याभागातील शेकडो नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. धक्कादायक म्हणजे अंदाजपत्रकात ९ फरशीपूल असताना ठेकेदाराने केवळ सहाच ठिकाणी ते बनवल्याचे प्रत्यक्ष पाहणीत उघड झाल्याने या कामात ठेकेदार आणि अधिकारी सरकारची दिशाभूल करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

ग्रामस्थांची कैफियत

औरंगाबादच्या दक्षिणेला चारही बाजूने डोंगराच्या महिरपेत निसर्गरम्य वातावरणात दडलेले परदरी हे छोटेसे गाव. येथील ग्रामस्थांनी टेंडरनामा प्रतिनिधीकडे तक्रार केल्यानंतर बुधवारी (ता. १७) सिंधोन गावापासून परदरी गावापर्यंत या रस्त्याची पाहणी केली असता अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे व डांबर-खडी निघण्याचा प्रकार सुरू झाल्याचे दिसून आले.

कामाची मुदत संपल्याच्या दोन वर्षानंतरही काम अर्धवट

औरंगाबादेतील पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत काम पाहणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास संस्थेचे कार्यालयात जाऊन या संपूर्ण रस्त्याचा लेखाजोखा काढला. यामध्ये कामाची मुदत संपून दोन वर्षे झाली तरी काम अर्धवट असल्याचे दिसते.

पाच वर्ष देखभाल- दुरूस्‍तीचे काय

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सुरु असलेल्या या रस्ता सुधारणा कामाचा तपशिल तपासला असता त्यात साडेतीन कि.मी. लांबीत ५ वर्षाच्या दुरुस्तीची किंमत १४ लाख २९ हजार नमूद केल्याचे दिसले.

असा आहे घोळ

- सदर कामात रस्त्याचे काटदर आणि साईड पट्ट्यांच्या भरावासाठी मातीकाम १६८७ घनमीटर (२९८ ट्रक) पाणी मारुन दबाई करण्याचा उल्लेख आहे

ग्रामस्थांचा आरोप - प्रत्यक्षात ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोदकाम करूनच उकरलेलीच माती पसरवली त्यावर कुठेही पाण्याचा वापर केला नाही. ग्रामस्थांनी ओरड करताच ठेकेदाराने दुष्काळाचे कारण सांगितले.

- रस्त्याचा अस्तित्वातील पहिला बेस एकूण साडेतीन मीटर लांबी आणि ५ मीटर रुंदीत १.५ फुटापर्यंत खोदून त्यावर ग्रॅन्युवल सब बेस (जीएसबी) २० एम. एम. ते ५० एम. एम. (एमपीएम) खडीचा थर तो ५९६ घनमीटर अर्थात १०५ ट्रक टाकून रोलरने सपाटीकरण करणे अपेक्षित होते.

ग्रामस्थांचा आरोप - मुळात ठेकेदाराने मानकाप्रमाणे खडी टाकली नाही. रोलरने सपाटीकरण देखील केली नाही. १०५ ट्रक खडी टाकलीच नाही.

- त्यानंतर वेटमिक्स बिटूमिनियस (wbm) यात ग्रेड २ अर्थात ७५ एम. एम. खडीचे दोन थर १२४२ घन मी. (२१९ ट्रक) अंथरूण पाणी मारून दबाई करणे अपेक्षित होते.

ग्रामस्थांचा आरोप - ठेकेदाराने हा लेअर टाकलाच नाही. केवळ खडीचा एकच थर तोही थातूरमातूर टाकला.


ही कामे झालीच नाहीत

एम पी एम - सदर कामात ( mpm) ५० एम. एम. जाड खडीचा थर टाकल्यानंतर १२५५८ चौ. मी. मध्ये २१.९८ मेट्रिक डांबर टाकणे

पूर्वमिश्रीत कारपेट - २० एम. एम. जाड खडीच्या थरावर १२५५८ चौ. मीटरमध्ये १६.८३ मेट्रिक टन डांबर टाकणे

सिलकोट - १२५५८ चौ. मीटरमध्ये १२.३० मेट्रिक टन डांबर टाकणे

टॅक कोट - १२५५८ चौ. मीटरमध्ये डांबर २.८३ मेट्रिक टन डांबर टाकणे.

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे कार्यकारी अभियंता सुनिल गुडसुरकर यांना थेट प्रश्न :

१. वर्क ऑर्डर आणि तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेवरून हे काम झाल्यावर रस्त्याची देखभाल व दुरुस्तीचे काम पाच वर्षांपर्यंत संबंधित ठेकेदाराची असेल. पण कामाची मुदत उलटून दोन वर्षे झालेतरी अद्याप काम पुर्ण नाही?

उत्तर - होय काम पूर्ण करण्याबाबत ठेकेदाराला नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यावर दंडात्मक कारवाई देखील सुरू केलेली आहे. महिन्याभरात काम सुरू करणार असल्याचे तो म्हणाला आहे.

२. काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. त्यात बरीच कामे झाले नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे?

उत्तर - मी मोजमाप पुस्तिकेसह संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करेल. कामाच्या दर्जाबाबत शंका असल्यास स्कोर टेस्ट करेल या प्रश्नाचे उत्तर शोधून सांगेल.

३. रस्त्यांचे कामे निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे या रस्यांवर अनेक ठिकाणी मोठ- मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत असे का?

उत्तर - मी तेच म्हणतोय आधी मला तपासणी करू द्या.

४. कधी करणार आपण तपासणी?

उत्तर - झाल्यावर आपल्याला कळवेलच

५. दोन वर्षे काम का रखडले?

उत्तर - दोन वर्षे कोरोनाकाळ होता. सरकारकडून बजेट मिळाले नाही. आता काम सुरू होतील.

६. पण काम तर कोरोना आधी दोन वर्षापूर्वीचे आहे मग निधीचा प्रश्न येतोच कुठे?

उत्तर - मी जरा एका साईटवर आहे. आपण नंतर बोलूया...