मुंबई (Mumbai) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai Ahmedabad Highway) मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हार पोलिस अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील खड्डे बुजवण्यास सुरवात केली आहे.
खड्डे बुजवतांनाचा व्हिडिओ व्हायरल होताच यावर शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. भाजप आणि शिंदे सरकारच्या कंत्राटदार मित्रांऐवजी खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. एखाद्या कंत्राटदाराला किंवा कंत्राटी कंपनीच्या मालकाला शासनाने असे खड्डे भरण्यास भाग पाडले आहे का? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) टॅग करत खड्ड्यांबाबत पोस्ट शेयर करून आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांची वाताहत झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे मुंबई अहमदाबाद मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये वाहने आदळून नादुरुस्त होत आहेत. तर वाहतूक देखील संथ गतीने पुढे जात आहे.
या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे आहे. मात्र, अद्याप त्यांनी दुरुस्ती सुरू न केल्यामुळे पोलिसांनीच हाती कुदळ आणि फावडे घेत या मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरूवात केली आहे. येथील खड्ड्यांमुळे मुसळधार पावसात अपघात होण्याची शक्यता असल्याने वाट न पाहता खड्डे बुजवण्यास सुरूवात केल्याचे पोलिसांनी सांगितले.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी पेल्हार जंक्शनवरील खड्डे सिमेंटने भरण्याची जबाबदारी हातात घेतली, असे पोलिस निरीक्षक वनकोटी यांनी सांगितले.
वनकोटी म्हणाले, "आम्ही एनएचएआयच्या अधिकाऱ्यांकडून खड्डे बुजवण्याची वाट पाहू शकत नव्हतो. या मार्गावर अनेक अपघात होत असल्याने आम्ही येथील खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला आहे. वाडा आणि पालघरकडे जाणारा पेल्हार जंक्शन महत्त्वाचा मार्ग आहे. सध्याची परिस्थिती पाहता वाहनचालकांना जंक्शन ओलांडण्यासाठी किमान एक तास लागतो.
याबाबत एनएचएआयचे प्रकल्प संचालक सुमीत कुमार म्हणाले की, एनएचएआयने नियुक्त केलेले कंत्राटदार दुरुस्तीची कामे करतात, परंतु आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असावी म्हणून पोलिसांनी तातडीने खड्डे बुजवले असावेत.