Sambhajinagar Tendernama
टेंडर न्यूज

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या रस्त्याचे कंत्राटदार अन् अधिकाऱ्यांनी बघा केले काय?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : तालुक्यातील जालना रोड ते वरूड फाट्यापर्येंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अख्ख्या रस्त्याचे डांबरच कंत्राटदार अन् अधिकाऱ्यांनी खाल्ल्याचे टेंडरनामा पाहणीत उघड झाले आहे. यामुळे ही योजनाच मोठी  भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी अत्यंत कासवगतीने आणि निकृष्ट काम होत असल्याचा पर्दाफाश टेंडरनामाने याच रस्त्याबाबत केला होता. दरम्यान पावसाळ्याचे कारण दाखवत अधिकाऱ्यांनी नंतर डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र वर्षभरानंतर प्रतिनिधीने या रस्त्याची पाहणी केली असता कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी अख्खा रस्ता डांबरीकरण न करताच गुंडाळल्याने  कंत्राटदाराच्या आणि अधिकाऱ्यांच्या कामाची पोलखोल झाली. रस्त्याच्या कामात टेंडर मध्ये खडीकरण, मजबुतीकरण रूंदीकरण व डांबरीकरण असल्याचे नमुद केलेले असताना यात डांबरीकरणाला फाटा देण्यात आला.यामुळे अधिकारी आणि कंत्राटदारामार्फत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला हरताळ फासला गेल्याचे दिसत आहे.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग एन एच एच 53 C जालना रोड ते फत्तेपूर ते वरूड फाटा या रोडच्या डांबरीकरणाचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले होते. या रोडवर डांबरीकरण न करताच कंत्राटदाराने गाशा गुंडाळला आहे. या रोडच्या कामात कंत्राटदारांनी तब्बल चार किलोमीटर लांबी अन् सात मीटर रूंदीचे डांबर अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदाराने खाल्ल्याचे उघड होत आहे. यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला हरताळ फासलं आहे. रस्त्याचं काम सुरू असताना  बोगस आणि कासवगतीने काम सुरू असल्याचा पर्दाफाश टेंडरनामाने सातत्याने वृत्तमालिकेद्वारे केला होता. या कामाचं पितळ उघडं पाडताच महाराष्ट्र ग्रामीण विकास नियंत्रण संस्थेच्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि शाखा अभियंत्यांनी पावसाळ्यानंतर डांबरीकरण करणार असल्याची ग्वाही टेंडरनामा प्रतिनिधीला दिली होती. मात्र दोन पावसाळे होऊनही डांबरीकरण करण्यात आले नाही. कंत्राटदार डांबर मिश्रित खडी टाकून पसार झाला आहे.

रस्त्यावर डांबरीकरण झालेच नसल्याची माहिती मिळताच प्रतिनिधीने रविवारी उशिरापर्यंत या रस्त्याची पाहणी केली. संबंधित अधिकार्यांना संपर्क केला असता त्यांची बोलतीच बंद झाली. खुप वेळा संपर्क करूनही त्यांनी उत्तर दिले नाही. बोगस कामाची माहिती मिळताच टेंडरनामाने जालनारोड ते वरूड फाट्यापर्येंत दुचाकीवर रस्त्याची पाहणी केली असता वाहन दगडगोट्यातून चालवता देखील येत नव्हते. अक्षरशः रस्त्यावरील दगडांनी वाहन घसरत होते. पायी चालतांना चंप्पलतोड आणि अंगठेफोड सोसावी लागत असल्याचे चित्र दिसले.प्रत्यक्षात टेंडरनामाच्या पाहणीत या बोगस काम करण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. आता माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी या संपूर्ण कामाची चौकशी करून सदरील कंत्राटदार आणि अभियंत्यावर कारवाई करण्याचे अपेक्षित आहे.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील फुलंब्री मतदार संघातील प्रमुख जिल्हा मार्ग-१८ जालनारोड - हिरापूर - सुलतानपूर ते वरूड फाटा या चार किमी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत नगरच्या मनिषा कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. याकामाची मुदत १२ महिन्याची होती. पण गेल्या अडीच  वर्षांपासून हा रस्ता पूर्ण करण्यात आला नसल्याने प्रवाशांसह पादचाऱ्यांना चालणेही अवघड होऊन बसले होते.  विशेष म्हणजे विलंबाने होत असलेल्या या कामाबाबत टेंडर नामाने प्रहार करताच उबाठा  सरकारच्या काळात माजी विधानसभा अध्यक्ष तथा विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांनी शेकडो गावकर्यांसह आंदोलन केले होते. मात्र, यांचाही यंत्रणेवर फारसा फरक पडला नव्हता.

या रस्त्याच्या दर्जाउन्नतीसाठी राज्य सरकारने‌ २०१९-२० मध्ये ग्रामीण विकास मंत्रालय व एशियन डेव्हलपमेंट बॅकेतर्फे दोन कोटी १२ लाख रुपये मंजूर केले होते. या रस्त्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत काम करणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. यावर अधिक्षक आणि कार्यकारी अभियंत्यांनी प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी दिल्यानंतर टेंडर प्रक्रियेतील यशस्वी झालेल्या अहमदनगरच्या किरण पागोरे यांच्या मनिषा  कंन्सट्रक्शन कंपनीला हे काम दिले. १९ मे २०२१ रोजी वर्क ऑर्डर दिल्यानंतर या रस्त्याचे भूमीपूजन स्वतः बागडे, तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मिना शेळके यांच्या हस्ते झाले होते. कंत्राटदाराने रस्त्याचे काम १२ महिन्यात पूर्णत्वास न्यायचे होते. परंतू रस्त्यावर गिठ्ठी अंथरून ठेवण्यात आली होती.गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामाबाबत टेंडरनामाने सातत्याने पाठपुरावा केल्याने धास्तावलेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावत कंत्राटदारामार्फत खडीकरण मजबुतीकरण करून रस्त्यावर डांबर मिश्रित खडी टाकून यंत्रणा गायब केली होती.

जालनारोड ते फत्तेपूर ते वरूड फाटा हा रस्ता पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक क्षेत्र व ऑरीक सिटीला जोडणारा एकूण चार किलोमीटरचा रस्ता आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून सुरू झालेल्या या कामाबद्दल नागरिकांना सुरुवातीपासून नाराजी होती. कामाच्या गुणवत्तेवर देखील नागरिकांची नाराजी होती. पण, रस्ता बनतोय त्यामुळे आता प्रवाशांचे हाल थांबतील या हेतूने कुणी सुरुवातीला बोलले नाही. पण, जसजसे काम पुढे सरकू लागले लोकांना कामातील बनावटपणा जाणवू लागला. नागरिकांना रस्त्याच्या कामात  डांबरीकरण झालेच नसल्याची खंत जीव्हारी लागली. त्यामुळे लोक  संतापले आहेत.कामामध्ये बनवाबनवी झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी टेंडर नामाला संपर्क केला. त्यात मुख्यमंत्री सडक योजनेत कंत्राटदाराने कसे बनावट काम केले त्याचा पुन्हा पर्दाफाश केला.