Eknath Shinde Tendernama
टेंडर न्यूज

मोठी बातमी : मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच; शिंदेंनी बंदी उठवली

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई मेट्रो ३ चे कारशेड आरेमध्ये होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यावर अधिकृत मोहोर उमटवली असल्याचे वृत्त आहे. मेट्रो कारशेड हे आरेमधून कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने आता ठाकरे सरकारचा निर्णय फिरवला असून आरे कारशेडवरील बंदी हटवली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे कारशेड कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला होता. आरेमधील मेट्रो शेड विरोधात नागरिक देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. यावरुन मोठा गदारोळ देखील झाला होता. आरेमध्ये कारशेड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात निर्णय झाला होता. मात्र, यावर महाविकास आघाडीने स्थगिती आणली होती. आता ही स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हटवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने आता ठाकरे सरकारचा निर्णय फिरवला असून आरे कारशेडवरील बंदी हटवली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. आरे कारशेडच्या कामासाठी आता सरकारी हालचाली सुरु झाल्या आहेत.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर पहिला निर्णय आरे कारशेडच्या निमित्ताने घेतला. मेट्रो ३ प्रकल्पासाठीची कारशेड ही आरे येथे नियोजित जागीच होणार असल्याचे कोर्टाला कळवण्याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सत्तेत आल्या आल्या 'आरे'मध्येच मेट्रो कार शेड होणार असल्याचे राज्याच्या अॅडव्होकेट जनरल यांना कळवले. आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले आहेत. याबाबत शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडावी, अशा सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत.

शिंदे सरकारने पहिल्याच बैठकीत ठाकरे सरकारचा निर्णय फिरवत पुन्हा एकदा मेट्रो 3 चे कारशेड हे आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचे जाहीर केले. यानंतर आता आरे कारशेडवरील बंदी हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. मेट्रो 3 चा मार्ग हा शहरातील मुख्य भागातून जाणार असल्याने लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाचा आहे. पण दुर्दैवाने या प्रकल्पाच्या नियोजित कारशेडला गेल्या काही वर्षांपासून विरोधाचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील फडणवीस आणि उद्धव ठाकरे या मुद्यावरुन आमने-सामने आले होते. आरे कॉलनीमध्ये कारशेड करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला शिवसेनेने सत्तेत राहून विरोध केला होता. शिवसेना नेते आदित्य ठाकरे त्यामध्ये आघाडीवर होते.