मुंबई (Mumbai) : गेल्या अडीच वर्षाच्या कामगिरीचा अहवाल आम्ही देत आहोत. महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात आणलेल्या बदलाचा हा अहवाल आहे. शेतकरी, महिला, कष्टकरी या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी सरकारने मेहनत घेतली. त्याचा लेखाजोखा आम्ही मांडत आहोत. तसेच आम्ही जनतेचे जीवन बदलण्याचा प्रयत्न केला असा दावा महायुतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आज केला.
निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा आज राज्यासमोर मांडला. राज्य सरकारच्या गेल्या दोन अडीच वर्षातील कामांचे रिपोर्ट कार्ड यावेळी सादर करण्यात आले. कला, क्रीडा, सांस्कृतिक, ग्रामीण विकास आणि रोजगार या सर्व गोष्टी आम्ही यात समाविष्ट केल्या आहेत. यावेळी अजित पवार पुढे म्हणाले की, "लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. पैसे येणार नाहीत, असा आरोप विरोधक करत आहेत. अनेकदा विरोधकांकडून काहीही आरोप करण्यात येत आहेत. त्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे, पण त्याला तारतम्य ठेवण्याची गरज आहे," असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
अजित पवार म्हणाले की, "विरोधकांकडून सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्याकडून फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुका दोन, तीन टप्प्यात घेतल्या जातील, अशा चर्चा विरोधकांनी केल्या. पण निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेते आणि ते स्वायत्त आहेत. त्यांचे निर्णय ते घेतात. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक घाबरले नाहीत तर ते गडबडले आहेत," अशी टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, "आमचा 2022 ते 2024 चे रिपोर्ट कार्ड तुमच्यासमोर ठेवत आहोत. महायुतीने तिजोरी मोकळी केली, असे आरोप काहीजणांनी केले. शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये काही तरतुदी केल्यात त्यावर टिंगलटवाळी केली. पण तरीही लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरली आहे. काही तरी बोलायचे आणि जनतेमध्ये संभ्रम पसरवायचे काम सुरु आहे," अशी टीका त्यांनी यावेळी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "विरोधकही घाबरलेले आहेत, असे मी म्हणणार नाही. लाडकी बहीण योजनेमुळे ते गडबडले आहेत. ही योजना लागू होणार नाही, असे ते सारखे सांगत होते. अर्ज नाकारले जातील, असे म्हणत होते. पण आम्ही अडीच कोटी बहिणींना लाभ दिला. महिलांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल त्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे ही योजना निवडणुकीपर्यंत असेल असे सांगितले गेले. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या साक्षीने सांगतो, आम्ही पैशाची तरतूद केली आहे. ही योजना तात्पुरती नाही," असा शब्द त्यांनी यावेळी दिला. "निवडणुका येत जात राहतील. पण तुमचे पैसे ठरले आहेत. ते कोणी काढून घेणार नाही. या योजनेतील पैशात वाढ करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे, आम्ही योग्य मांडणी करून ही योजना लागू करत आहोत," असेही ते म्हणाले. "सुशील कुमार शिंदे यांनी वीज बिल माफ केले. त्यानंतर त्यांनी ते पुन्हा सुरू केले. आम्ही अशा गोष्टी करणार नाही. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे." असा विश्वास त्यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दिला.