Mumbai Tendernama
टेंडर न्यूज

राज्यात 1100 कोटींचे पूल, भुयारी मार्गांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महारेल’तर्फे महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या ४४० कोटी रुपयांच्या ९ रेल्वे ओलांडणी उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि नियोजित ७०० कोटी रुपयांच्या ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून गतीने ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

शिवाजीनगर, पुणे येथील पोलीस मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्री. गडकरी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल कांबळे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, राज्य आणि केंद्र एकत्र आल्याने चांगली कामे उभी राहत आहेत. रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या ठिकाणी फाटक नसले की नागरिकांच्या जीवाला धोका असतो. म्हणून असे प्रकल्प लवकर पूर्ण करून जनतेचा त्रास दूर करण्याचे प्रयत्न आहे. राज्यात रेल्वेसंबंधी प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावेत म्हणून राज्य शासनाने महारेलची स्थापना केली. महारेलतर्फे वेगाने कामे करण्यात येत आहेत. राज्यात ९ उड्डाणपूलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपूलांचे भूमिपूजन प्रथमच होत आहे. उड्डाणपूल आणि भूयारी मार्गाच्या कामांमुळे जनतेचा वेळ वाचणार आहे.

नागरिकांचा वेळ वाचावा आणि कार्यक्षमता वाढावी यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. देशात पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामे महाराष्ट्रात सुरू आहेत. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ क्षमता आहे, दळवळण सुविधा आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. राज्यातील प्रकल्प उभारणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वेगाने निर्णय घेण्यात येत आहेत. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात राज्यात गुंतवणूक करीत आहेत. समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने  विकासाचा महामार्ग होणार आहे.

राज्यात केंद्र सरकारच्या सहकार्याने अनेक विकासकामे होत आहे. मडगाव-मुंबईच्या रुपाने चौथी वंदे भारत रेल्वे महाराष्ट्राला मिळाली आहे. मुंबई-पुणे महामार्गाच्या माध्यमातून पुण्याच्या प्रगतीला गती मिळाली आहे. या महामार्गावर प्रवास करताना वेळ वाचावा यासाठी  खालापूर ते सिंहगड इन्स्टिट्यूट असा जगातला सर्वाधिक रुंदीचा बोगदा मिसिंग लिंक अंतर्गत तयार करण्यात येत आहे. पुणे मेट्रो, पुण्यातील रिंगरोड, चांदणी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक कामे करण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाद्वारे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा आणि योजनांचा लाभ देण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कात्रज चौक ते खडीमशीन मोठा पूल तयार केल्यास त्याचाही लाभ नागरिकांना होईल. महाबळेश्वर येथील वाई-सुरूर-महाबळेश्वर-पोलादपूर हा मार्ग केंद्राने केल्यास पर्यटन वाढीसाठी त्याचा उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.

दरवर्षी ११ उड्डाणपूल याप्रमाणे १६ हजार कोटींची कामे करणार- मंत्री गडकरी -
यावेळी गडकरी म्हणाले, सेतू बंधन योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ११ उड्डाणपूलांसाठी १०० टक्के निधी भारत सरकारने मंजूर केला आहे. महाराष्ट्र प्रगतीशील आणि संपन्न राज्य आहे. राज्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे फाटकांचे रुपांतर उड्डाणपुलात करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन आणि रेल्वेने मिळून ९ उ्डाणपूल पूर्ण केले आणि ११ पूलांचे भूमिपूजन होत आहे. दरवर्षी ११ पूल याप्रमाणे  १६ हजार कोटींची ही कामे करण्यात येणार आहेत. येत्या  काळात फाटकमुक्तीसाठी उ्डाणपूल बांधून जनतेला चांगली सुरक्षा देण्यात येईल. महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे. महामार्ग आणि रस्त्यांची कामे वेगाने होत आहे. पुण्यात पालखी मार्गाचे काम वेगाने होत आहे. पालखी तळाच्या विकासाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी चांगला आराखडा करून ही कामे पूर्ण करण्यात येतील. पालखी मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल आणि महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे हे काम होईल.

‘महारेल’ने रेल्वेचे नियम लक्षात घेऊन चांगले काम केले आहे.  योजनेअंतर्गत एकूण ९१ पूल उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात २५ आणि दुसऱ्या टप्प्यात ६६ पूल प्रस्तावित आहेत. यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना महारेलला देण्यात आल्या असून त्यांच्याकडेच ही जबाबदारी  देण्यात येणार आहे. महारेल गुणवत्तापूर्ण कामे करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वेच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारने रेल्वेसह स्थापन केलेल्या महारेलने चांगले काम केले आहे. या सर्व प्रकल्पात रेल्वेच्या नियमांचे पालन करतानाच वेळेत काम पूर्ण करण्यात आले आहे, असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

४४० कोटी रुपयांच्या ९ उड्डाणपुलांचे लोकार्पण -
महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे उभारण्यात आलेल्या ४४० कोटी रुपयांच्या राज्यातील ९ उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले. यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे मंत्रालयाच्या यांच्या भागीतदारीतून उभारण्यात आलेल्या ८ पुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर केंद्रीय रस्ते निधीतून सेतूबंधन योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या एका पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. यात मध्य रेल्वेच्या पाटण-पंढरपूर राज्य महामार्गावरील मसूर ते शिरवडे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक क्र. ९२ येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या अतिग्रे-इचलकरंजी राज्य महामार्गावरील रुकडी ते हातकणंगले रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. २० येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या रहिमतपूर-सातारा रोडवरील रहिमतपूर ते तारगाव रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र.८१ येथील दोन पदरी उड्डाणपूल, पश्चिम रेल्वेच्या अमळनेर-चोपडा राज्य महामार्गावरील अमळनेर ते टाकरखेडे रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. १३६ येथील दोन पदरी उड्डाणपूल, पश्चिम रेल्वेच्या सिंदखेडा-चिमठाणा राज्य महामार्गावरील सोनशेलू ते शिंदखेडा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ११२-ए येथील दोन पदरी उड्डाणपूल, दक्षिण मध्य रेल्वेच्या हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावरील हिंगोली ते धामणी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. १४४बी येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या डोंगरगाव-गुमगाव रोडवरील बुटीबोरी ते अजनी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ११६ येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या उमरेड- बुटीबोरी रोडवरील बुटीबोरी ते सिदी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. १११ येथील दोन पदरी उड्डाणपूलाचा आणि सेतूबंधन योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या उमरेड बस स्टॅन्ड जवळील उमरेड ते भिवापूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ३४ येथील दोन पदरी उड्डाणपूलाचा समावेश आहे.

७०० कोटी रुपयांच्या ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन -
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते यावेळी सेतू बंधन योजनेअंतर्गत महारेलतर्फे उभारण्यात येणाऱ्या ७०० कोटी रुपयांच्या ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजनदेखील करण्यात आले. यात पालघर जिल्ह्यातील तेवडीरोडवरील दिवा ते वसई रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. १० येथील दोन पदरी उड्डाणपूल, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा-वडगाव रोडवरील श्रीगोंदा रोड ते बेलवंडी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ८ येथील दोन पदरी उड्डाणपूल, सांगली जिल्ह्यातील बुधगाव-सांगली रोडवरील सांगली ते माधवनगर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. १२९ येथील दोन पदरी उड्डाणपूल, सातारा जिल्ह्यातील कोळवडी रेवडी रोडवरील पळशी ते जरंडेश्वर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ५२ येथील दोन पदरी उड्डाणपूल, सोलापूर जिल्ह्यातील आसरा चौक पुलाजवळील सोलापूर ते वाडी रेल्वे स्थानकांदरम्यान सीएच ४५८/५ येथील दोन पदरी उड्डाणपूल, धाराशिव जिल्ह्यातील ढोकी ते धाराशिव रोडवरील पालसप ते कळंबरोड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ३४ येथील दोन पदरी उड्डाणपूल, लातूर जिल्ह्यातील लातूर शहर रस्त्यावरील कुर्डुवाडी ते लातूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. २ येथील दोन पदरी उड्डाणपूल, जळगाव जिल्ह्यातील शिरसोली ते जळगाव रेल्वे स्थानकांदरम्यान जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील दोन पदरी उड्डाणपूल आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-सांगोला रोडवरील कुर्डुवाडी ते मिरज रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. २४ येथील दोन पदरी उड्डाणपूलांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव टाऊन रोडवरील जळंब ते खामगाव रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ६ येथील भुयारी मार्ग, ठाणे जिल्ह्यातील कळमगाव जवळील आटगाव ते तानशेत रेल्वे स्थानकांदरम्यान सीएच ९८ /२ येथील भुयारी मार्गाच्या कामाचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले.