नाशिक : महिला प्रशिक्षणासाठी महानगरपालिकेने काढलेले टेंडर भाजपच्या अंतर्गत कुरघोड्यांमुळे कसे एका संस्थेच्या पदरात पडले हे नाशिकमध्ये पाहायला मिळाले. त्र्यंबकेश्वरच्या श्रीराम कृष्ण संस्थेसाठी भाजपच्या आमदाराने लावलेला जोर कमी पडला असून भाजपच्याच नगरसेवकाने इंद्रजीत टेक्निकल इन्स्टिट्यूटला काम मिळवून देण्यात भारी पडला आहे.
नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत दरवर्षी महिलांना रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण दिले जाते. गेल्या तीन वर्षांपासून प्रशिक्षण विविध कारणांमुळे रेंगाळले होते. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ठेक्यावर शंका व्यक्त करत प्रशिक्षणाचे काम थांबविले. मुंडे यांच्या बदलीनंतर प्रशिक्षण कार्याची नस्ती पुन्हा हलली. निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर नाशिकसह मुंबई, पुणे नागपूरचे ठेकेदार सहभागी झाले. परंतु नाशिकच्या ठेकेदार कंपनीला काम मिळवून देण्यासाठी भाजप नगरसेवकांनी कंबर कसली.
अर्थात ज्या संस्थेला काम द्यायचे त्या इंद्रजीत टेक्निकल इन्स्टिट्यूट पदाधिकारी भाजपच्या नेत्यांशी संबंधित असल्याने सारे काही जुळवून आणले. इंद्रजीत ला काम मिळावे म्हणून निविदेतील अटी व शर्ती बदलण्यात आल्या. त्यामुळे आपोआप इतर संस्थांचे पत्ते कट झाले.
आमदाराच्या उडीने बदलली सूत्रे
निविदेतील अटी व शर्ती बदलल्याने एकच प्लेअर म्हणजे इंद्रजीत टेक्निकल इन्स्टिट्यूट संस्था एकमेव राहिली. परंतु एकच संस्था पात्र ठरत असल्याने पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबविली गेली. त्यात इंद्रजीत बरोबर त्रंबकेश्वरच्या श्री रामकृष्ण आरोग्य संस्था संस्थेने निविदेत सहभाग घेतला. श्रीरामकृष्ण संस्थेसाठी शहरातील भाजप आमदाराचा अट्टहास सुरू झाल्याने नगरसेवक विरुद्ध आमदार असा संघर्ष उभा राहिला. यात भाजपचे वर्चस्व असलेल्या समिती सभापतींची कोंडी झाली. मात्र त्यांचाही कल आमदारांच्या बाजूने राहिला. ओढा तानीच्या या खेळात प्रशासनाने फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला. यात इंद्रजीत टेक्निकल इन्स्टिट्यूट, श्री रामकृष्ण आरोग्य संस्था व निदान टेक्नॉलॉजी या तीन संस्थांनी सहभाग नोंदविला. अचानक निदान टेक्नॉलॉजी चा उगम कसा झाला? याबद्दल प्रशासनाने तोंडावर बोट ठेवले. मात्र इंद्रजीतला काम न मिळाल्यास निदान टेक्नॉलॉजी या संस्थेला काम देण्यासाठी ही धडपड असल्याचे बोलले जात आहे. भाजपमधील अंतर्गत राजकीय ओढातानित प्रशासनाने इनकॅमेरा निविदा उघडली. त्यात पुन्हा इंद्रजीत टेक्निकल इन्स्टिट्यूट लाच सुमारे सहा कोटी रुपयांचे काम देण्यात आले. आमदाराला नगरसेवक भारी पडल्याची खुमासदार चर्चा या निमित्ताने पालिकावर्तुळात सुरू झाली आहे.
महिला प्रशिक्षण ठेक्याची निवीदा इन कॅमेरा उघडण्यात आली. सर्वात कमी दर इंद्रजीत टेक्निकल इन्स्टिट्यूटचे असल्याने काम मिळाले.
- कैलास सोनवणे, संचालक, इंद्रजीत टेक्निकल इन्स्टिट्यूट.