CIDCO Tendernama
टेंडर न्यूज

CIDCO : सिडकोच्या भूखंड विक्रीकडे ग्राहकांनी का फिरवली पाठ? तब्बल 32 भूखंडांसाठी...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सिडकोच्या (CIDCO) भूखंड विक्री कडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येते. ४७ पैकी फक्त १५ भूखंडांना ग्राहकांनी प्रतिसाद दिला असल्याचे स्पष्ट झाले असून उर्वरित ३२ भूखंडांसाठी एकही प्रस्ताव सिडकोकडे आलेला नाही. दरम्यान, सिडकोला खारघर (Kharghar) येथील 26,477.87 चौरस मीटर भूखंडासाठी 7,16.58 कोटी इतकी किंमत मिळाली आहे.

सिडकोची हजारो घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत, ती विकण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर उभे आहे. असे असताना आता सिडकोच्या भूखंडांनाही फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सिडकोच्या पणन विभागाने अलीकडेच जाहीर केलेल्या भूखंड विक्री योजना क्रमांक ४० अन्वये नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये असलेल्या विविध आकाराच्या आणि वापराच्या ४७ भूखंडांसाठी प्रस्ताव मागविले होते.

यात खारघर नोडमधील २० भूखंडांचा समावेश होता. त्यापाठोपाठ घणसाेली नोडमधील १० भूखंड उर्वरित ऐरोली, द्रोणागिरी, कळंबोली, कोपर खैरणे, नेरूळ, नवीन पनवेल (पूर्व) येथे. आणि पनवेल (पूर्व) येथील होते.

निवासी, निवासी आणि वाणिज्यिक तसेच फक्त वाणिज्यिक वापराचे हे भूखंड होते. यात लहान आकाराचे बंगलो प्लॉटचा सुद्धा समावेश होता. नुकताच या योजनेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ४७ पैकी फक्त १५ भूखंडांना ग्राहकांनी प्रतिसाद दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित ३२ भूखंडांसाठी एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.

या भूखंडांचे दर अधिक असल्याने ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अगोदरच घरे विकली जात नाहीत. आता भूखंडांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सिडकोसमोरचा पेच वाढला आहे.

यशस्वी बोली लावणाऱ्यांमध्ये गोदरेज प्रॉपर्टीजचा समावेश आहे, कंपनीने खारघरच्या सेक्टर 5A मध्ये तीन लगतचे भूखंड खरेदी केले. 7,16.58 कोटींमध्ये हा व्यवहार झाला आहे. 26,477.87 चौरस मीटर इतके हे एकत्रित क्षेत्रफळ आहे. सरासरी 2,70,633 प्रति चौरस मीटर इतका दर मिळाला आहे. गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे यांनी येथे समूह गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याची त्यांची योजना असल्याचे सांगितले.

याबाबत सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले, “योजनेत खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आमच्या पूर्वीच्या योजनेत आम्ही 18 भूखंड विकल्यानंतर लगेचच, 34 भूखंड दोन महिन्यांत विकले गेले. हे खूप सकारात्मक आहे आणि बाजाराच्या गरजेशी सुसंगत आहे.”