link road tendernama
टेंडर न्यूज

Mumbai : तुर्भे ते खारघर लिंक रोडचे टेंडर 'या' कंपनीच्या खिशात; सिडकोमुळे अखेर...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai0 : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे ते खारघर लिंक रोडचे टेंडर 'रित्विक एव्हरास्कॉन' या संयुक्त भागीदारातील कंपनीला मिळाले आहे. सुमारे ३,१६६ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्धिष्ट आहे. तुर्भे ते खारघर हा ५.४९ किलोमीटर लांबीचा चौपदरी मार्ग आहे. त्यामुळे वाशी ते खारघर हे अंतर १५ मिनिटांनी कमी होणार आहे.

राज्य सरकारने या प्रकल्पाची जबाबदारी याआधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात 'एमएसआरडीसी'वर सोपविली होती. 'एमएसआरडीसी'ने या प्रकल्पाचा विकास आराखडाही तयार केला. मात्र, महामंडळाला हा प्रकल्प व्यवहार्य वाटला नाही. त्यामुळे महामंडळाने यातून माघार घेतली. गेली ५ वर्षे या प्रकल्पाच्या अनुषंगाने कोणतीच प्रगती झाली नाही. त्यामुळे राज्य शासनाने अखेर हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी सिडकोवर टाकली. त्यानुसार या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सिडकोने अलीकडेच टेंडर प्रसिद्ध केले होते. त्याला ४ मोठ्या कंपन्यांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी सर्वाधिक कमी किंमतीचे टेंडर 'रित्विक एव्हरास्कॉन' या संयुक्त भागीदारातील कंपनीने भरले. त्यामुळे हे टेंडर संबंधित कंपनीला देण्यात आले आहे. सिडकोच्या संचालक मंडळानेसुद्धा त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

तुर्भे-खारघर लिंक रोड प्रकल्पामुळे ठाणे- बेलापूर रोड, पामबीच आणि सायन- पनवेल या मार्गांवरील वाहनांची वर्दळ कमी होणार आहे. सिडकोने नवी मुंबईतील दळणवळण यंत्रणेवर अधिक लक्ष केंद्रीत करुन नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांवर हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत.