railway Tendernama
टेंडर न्यूज

भंगाराची कोटीच्या कोटी उड्डाणे; मध्य रेल्वेला ५७ कोटी उत्पन्न...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मध्य रेल्वेने (Central Railway) गेल्या दोन महिन्यांमध्ये तब्बल 57 कोटी 29 लाखांची भंगार विक्री केली आहे. 2021 मध्ये भंगार विक्रीतून रेल्वेला 9 कोटी 21 लाखांचा महसूल मिळाला होता. त्या तुलनेत यंदा भंगार विक्रीच्या महसुलात सहापट वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेच्या प्रत्येक विभागातील आणि कार्यशाळेमधील हे भंगार आहे. यामध्ये डबे, वॅगन, लोकोमोटिव्ह स्क्रॅप रुळ आदींचा समावेश आहे. दरवर्षी मध्य रेल्वे भंगाराची विल्हेवाट लावत असते. यामधून मोठा महसूल देखील रेल्वेला मिळतो.

मध्य रेल्वेने भंगार साहित्यातून मुक्तता मिळविण्यासाठी झिरो स्क्रॅप मिशन हा उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे रेल्वेच्या या उपक्रमाचे काैतुकही केले जात आहे. कारण या उपक्रमामुळे रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होणार आहे. रेल्वेने विकलेल्या या भंगारामध्ये मध्य रेल्वेचे सर्व विभागातील भंगार साहित्य, कार्यशाळेतील साहित्य, शेड आणि विविध डेपोमधील सर्व भंगार विक्री करण्यात आले. या भंगार सामग्रीमध्ये स्क्रॅप रूळ, पर्मनंट-वे सामग्री, भंगार वापरात नसलेले साहित्य डबे लोकोमोटिव्ह इत्यादींचा समावेश आहे.

यासंदर्भात रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी म्हणाले की, रेल्वे फक्त महसूलसाठीच भंगार विकत नाहीतर यामुळे परिसर देखील स्वच्छ होण्यास मदत होते. शून्य स्क्रॅप मिशनचा एक भाग म्हणून कार्यशाळा, शेड आणि विविध डेपोवर असलेले भंगार हटविण्यात येते. यामुळे रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ राहतो. एरवी स्टेशन परिसरामध्ये रेल्वेचे विविध साहित्य पडलेले असते. यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसते. हेच टाळण्यासाठी रेल्वेने हा उपक्रम हाती घेतला आहे.