Chhatrapati Sambhajinagar Tendernama
टेंडर न्यूज

Sambhajinagar : रेल्वे स्टेशनच रुपडं बदलणार; 225 कोटीचा निधी मंजूर

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : देशभरातील रेल्वे स्टेशनचा विकास करण्यासाठी अमृतभारत स्टेशन योजना राबवली जात आहे. दरम्यान याच योजनेअंतर्गत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनसाठी आनंदाची बातमी टेंडरनामाच्या तपासात समोर आली आहे. या योजनेच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनमधील प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील असा विकास केला जाणार आहे.

यामध्ये थ्री डी रूफ प्लाझा, फुडप्लाझा, वाणिज्य संकुल, वातानुकुलीत आणि आरामदायक वेटींग कक्ष, चिल्ड्रनपार्क, प्रशस्त पार्किंग, भव्य प्रवेशद्वार आदी सुविधांसह विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्टेशनचा विकास केला जाणार आहे. या रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी जून महिन्यापर्यंत टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश होते. यासंदर्भात टेंडरनामाने रेल्वेच्या विश्वसनीय सूत्रांकडे विचारणा केली असता. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणासाठी २२५ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे. यासाठी लातुरच्या खंडू पाटील यांच्या के. एच. कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हाती आली आहे. येत्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात या रेल्वे स्टेशनच्या विकास कामाला सुरुवात होणार असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरवासीयांना दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी शब्द पाळला आणि अखेर रेल्वे स्टेशनच्या निजामकालीन जुनाट इमारत आणि परिसराचा कायापालट करण्याचे स्वप्न अखेर खरे ठरले. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत टेक्नो इकॉनॉमिक्स फिजिबिलिटी स्टडीच्या माध्यमातून येथील स्टेशन विकसित होणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात २२५ कोटीची तरतूद देखील करण्यात आली आहे. यासाठी २२५ कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे आता लवकरच रेल्वे स्टेशनचे रुपडे बदलणार आहे.

सात महिन्यापूर्वी अर्थात ३ ऑक्टोबर २०२२ रोजी शहराच्या रेल्वेस्थानकावरील पाच क्रमांकाच्या फलाटावर प्रस्तावित असलेल्या पिटलाइनच्या उद्घाटनानिमित्त केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याहस्ते पिटलाइनच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. दरम्यान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, तथा केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथील रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आधीपासूनच पाठपुरावा केला होता. डॉ. कराड आणि दानवे यांच्या पाठपुराव्यामुळे  स्थानकावर २९ कोटी ९४ लाख रुपयांची खुली पिटलाइनचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यानंतर आता विमानतळाच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन उभारणीच्या कामाला कंत्राटदार देखील निश्चित केला  आहे. कालच शहरातील एमआयडीसीत पायाभुत सुविधांचे भूमिपूजन करण्यात आले. विभागीय क्रीडा संकुलाचे देखील रूपडे पालटत आहे. त्यात आता रेल्वे स्टेशनची दुर्दशा बदलण्यात येत असल्याने हा महिना एप्रिल फुल नसून शहराच्या विकासासाठी खरा ठरल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे.