Aurangabad

 

Tendernama

टेंडर न्यूज

3 कोटींच्या सिमेंट रस्त्याला दोन वर्षात भेगा; कंत्राटदारावर प्रश्न

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : सिडको (Cidco) भागातील एका रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले. मात्र, दोन वर्षातच या सिमेंट रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा गेल्याचे दिसत आहे. यावरून हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप माजी मंत्री व आमदार अतुल सावे (Atul Save) यांनी केला आहे. एवढेच नव्हेतर यासंदर्भात त्यांनी महापालिका प्रशासकापासून नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव आणि मुख्यमंत्रांना देखील तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्याप कुणीही उत्तर दिले नसल्याचे सावे यांनी टेंडरनामाशी बोलताना सांगितले. संबंधित ठेकेदाराला नक्की कुणाचा आशीर्वाद आहे, याची चर्चा औरंगाबादेत होत आहे.

औरंगाबादेतील सिडको-हडको व इतर भागात जाण्यासाठी बजरंग चौक ते चिश्तिया चौक हा रस्ता महत्त्वाचा असल्याने; तसेच व्हीआयपी जळगावरोड व जालना रोड तसेच गरवारे ते किराडपुरा, एसबीआय चौक ते जकातनाका चौककडे जाण्यासाठी सिडको-हडकोतील लाखो लोकांची या रस्त्यावरून दररोज वाहने जात असल्याने तीन वर्षांपूर्वी या रस्त्यासाठी सरकारच्या विशेष अनुदानित रकमेतून औरंगाबाद महापालिकेने व्हाइट टाॅपिंग तंत्रज्ञान वापरून काॅक्रीटीकरण केले ; परंतु रस्त्याचे काम होऊन तीन वर्ष देखीव उलटले नाहीत तोच या सिमेंट रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा (चिरा) गेल्या असून, या रस्ताचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. संबंधित ठेकेदाराचे पितळ उघडे पडले असून, या ठेकेदाराला आशीर्वाद कुणाचा अशी भावना वाहनधारक व्यक्त करीत आहे.

औरंगाबादेतील सिडको-हडकोसाठी अत्यंत वर्दळीचा हा रस्ता आहे. २००६ मध्ये सिडकोचे महापालिकेत हस्तांतर झाल्यानंतर तब्बल सोळा वर्ष नागरिकांना धुळीचा सामना करावा लागला होता. २०१७-१८ च्या सरकारी अनुदानित रक्कमेतून या रसत्याच्या बांधकामासाठी तब्बल तीन कोटी रूपये मंजुर करण्यात आल्याने आता हा रस्ता चांगला बनणार; तसेच खड्ड्याच्या साडेसातीतुन सूटका होणार या आशेने बजरंग चौक ते चिश्तिया काॅलनीकडे ये-जा करणारे वाहनधारक; तसेच या मार्गावर असलेले व्यापारी समधान व्यक्त करीत होते; परंतु औरंगाबादेतीलच काळ्या यादीत समावेश असा आरोप असलेल्या जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने हे काम घेतले होते व रस्त्याचे काम सुरू केले; परंतु तरीही या रस्त्याचे इतर रस्त्यांप्रमाणे याही रस्त्याचे पार वाटोळे केले.

बजरंग चौक ते चिश्तिया चौक दरम्यान झालेल्या सिमेंट रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेले. यात आविष्कार काॅलनी ते चिश्तिया चौकापर्यंत ठेकेदाराने केलेल्या कामाला जास्त ठिकाणी तडे गेले आहेत. 'आता जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर' या चिरा पडलेली ठिकाणे नवीन करणार का? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. सरकारने शंभर कोटी रुपये मंजूर केल्यानंतर जालनारोडकडुन सिडको व हडकोकडे जाण्यासाठी महत्त्वाचा असलेला बजरंग चौक ते चिश्तिया काॅलनी रस्ता काँक्रिटीकरणातून मजबूत करण्यास मंजुरी दिली गेली. एक किलोमीटर लांबी व दोन्ही बाजुने साडेसात मीटर रूंदीच्या रस्त्याचे मजबुतीकरण, रुंदीकरण व काॅक्रीटीकरण करण्यासाठी 'महापालिके'ने ४ डिसेंबर २०१८ रोजी ३ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी दिली.

बारा महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु शंभर कोटीच्या पहिल्याच पॅकेजमध्ये या ठेकेदाराकडे अनेक रस्त्यांची कामे असल्याने या रस्त्याच्या कामाचा कालावधी वाढला. काम सुरू होण्यास वर्षभराचा उशीर झाला. काँक्रिटीकरण करण्यासाठी बजरंग चौक ते गुलमोहर काॅलनी, गुलमोहर काॅलनी ते राजीव गांधी स्टेडियम, राजीव गांधी स्टेडीयम ते आविष्कार चौक, आविष्कार चौक ते चिश्तिया चौक असे चार टप्पे पाडले. रस्त्याचे काम झाल्यावर त्याची उंची वाढल्याने दर पावसाळ्यात नागरिकांच्या घर आणि दुकानात पाणी शिरते. जोडरस्त्यांचा भाग खोलगट झाल्याने वसाहती पाण्याखाली येतात. त्यात आता चिराचिरा रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालकांचे हाल होत आहेत. आमदार अतूल सावे यांनी या रस्त्याची आयआयटीच्या तज्ज्ञांकडुन तपासणी करून ज्या ठिकाणी रस्त्याची कामे बोगस केली आहेत. तेथील कंत्राटदारांना 'ब्लॅक लिस्ट'करून नवीन कंत्राटदारामार्फत रस्ता दुरूस्ती करून यांच्याकडुन रस्त्याच्या बांधकामासाठी खर्च झालेला सर्व निधी वसुल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

महापालिका प्रशासकांकडुन अपेक्षा

रस्त्याची अवस्था पाहता या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. प्रशासकांनी सदरील विभागाची बैठक लावून जेथे रस्ता निकृष्ट झाला, तो पुन्हा करण्यासाठी सूचना द्याव्यात

- रस्त्यावर जिथे चिरा गेल्या आहेत, त्याची पाहणी प्रशासकांनी करावी व ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे चिरा तडे गेले आहे तो भाग तोडून नवीन करावा.