मुंबई (Mumbai) : महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील वात्रक नदीवरील पुलाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. हा पूल आनंद आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकादरम्यान आहे. बुलेट ट्रेनचा बिलीमोरा ते सुरत हा पहिला टप्पा २०२६ मध्ये सुरु होणार आहे.
देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एनएचएसआरसीएल) करण्यात येत आहे. या प्रकल्पात एकूण २४ नदींवर पूल तयार करण्यात येणार आहेत. यापैकी गुजरातमध्ये २० आणि महाराष्ट्रात ४ नद्यांवर पूल असतील. गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील वात्रक नदीवर एकूण २८० मीटरचा पूल उभारण्याचे काम पूर्णत्वास गेले. या पुलासाठी ७ फुल स्पॅन गर्डर्स वापरण्यात आले असून प्रत्येक गर्डर ४० मीटर आहे. या गर्डर्सना ९ ते १६ मीटर उंचीच्या पिअर्सचा आधार देण्यात आला आहे. वात्रक पूल हा आनंद आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकादरम्यान आहे. आतापर्यंत २४ पैकी १० नदी पुलांचे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रातील नद्यांवर चार पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यात दोन पुलांची उभारणी उल्हास नदीवर तर एका पुलाची उभारणी वैतरणा नदीवर अन्य एका पुलाची उभारणी जगनी नदीवर होत असून या तिन्ही नद्या पालघर जिल्ह्यातील आहेत.
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात, दीव-दमण येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे वांद्रे-कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या १२ स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनची चार स्थानके आहेत. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचे महाराष्ट्रातील सुरुवातीचे स्थानक बीकेसी येथे आहे. या अंडरग्राऊंड स्थानकासाठी मोठा खड्डा खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. यात आता टीबीएम मशीन टाकण्यात येणार आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंनी बोगदा खणण्याचे काम सुरु होणार आहे. बीकेसी आणि शिळफाटा येथील या बोगदा 21 किमी बोगद्याचे काम सुरु असून या बोगद्याचा 7 किमी भाग ठाणे खाडीच्या खालून जाणार आहे. त्यामुळे हा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे. ठाणे, विरार आणि बोयसर स्थानकाची कामे सुरु आहेत. या उन्नत मार्गासाठी खांब उभारण्यासाठी 100 हून अधिक फाऊंडेशनची कामे अलीकडेच पूर्ण झाली आहेत. तर पालघर जिल्ह्यात डोंगरात पाच बोगदे खोदण्याचे काम सुरु झाले आहे.