BMC Tendernama
टेंडर न्यूज

BMC : कोविडवर 4 हजार कोटींचा खर्च; ऑक्सिजन प्लांट प्रकरणात ठेकेदाराला का झाली अटक?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगरपालिकेतर्फे (BMC) कोविड काळात झालेल्या ४,१५० कोटी रुपयांच्या खर्चाची आकडेवारी अखेर उपलब्ध झाली आहे. यात सर्वाधिक १,४६६.१३ कोटी खर्च जम्बो सुविधा केंद्रांवर करण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोना काळात मुंबईतील ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्रमुख रोमिन छेडा याला अटक केली. कोणताही अनुभव नसताना आणि नियमांमध्ये बसत नसताना हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका आयुक्त कार्यालयात अर्ज करत कोविड काळात करण्यात आलेल्या चार हजार कोटी रुपयांच्या खर्चाबाबत सादर अहवालाची प्रत मागितली होती. कोणत्याही विभागाने माहिती दिली नाही. याबाबत लेखी तक्रार करताच महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी अनिल गलगली यांना तपशीलवार माहिती दिली. ही आकडेवारी ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंतची आहे.

यात अन्नाची पाकिटे आणि अन्नधान्य यावर १२३.८८ कोटी, मध्यवर्ती खरेदी विभागाने २६३.७७ कोटी, वाहतूक विभागाने १२०.६३ कोटी, यांत्रिक आणि विद्युत विभागाने ३७६.७१ कोटी, घन कचरा विभागाकडून ६.८५ कोटी खर्च करण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधींना फक्त नऊ लाख रुपयांचा निधी दिला आहे.

मुंबईतील १३ जम्बो सुविधा केंद्रांवर १,४६६.१३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पाठोपाठ मुंबईतील २४ वॉर्ड आणि सेव्हन हिल रुग्णालयाने १,२४५.२५ कोटी रुपये खर्च केला आहे. कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाने २३३.१० कोटी खर्च केले आहेत. मुंबईतील पाच प्रमुख रुग्णालयात १९७.०७ कोटी, सहा विशेष रुग्णालयांनी २५.२३ कोटी, १७ पेरिफेरल रुग्णालयानी ८९.७० कोटी आणि नायर रुग्णालयाने १.४८ कोटी रुपये खर्च केले आहेत.

ही आकडेवारी जरी स्पष्ट असली तरी, कोविड काळातील सर्व प्रकारच्या खर्चावर श्वेतपत्रिका काढली जाणे आवश्यक आहे जेणेकरून अजून सुस्पष्टता येईल, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.

कोरोना काळात मुंबईतील ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्रमुख रोमिन छेडा याला अटक केली. गुन्हे शाखेने रोमिन याची गुरुवारी सलग आठ तास चौकशी केली होती. त्यानंतर शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली.

रोमिन याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी (ता. २२) रात्री नागपाडा पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

रोमिन छेडा हे हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक असून या कंपनीला कोविड काळात ऑक्सिजन प्लांटशी संबंधित कंत्राट देण्यात आले होते. या सर्व प्रकरणात गैरप्रकार आढळल्याने आर्थिक गुन्हे शाखेने रोमिन याची चौकशी केली होती. मुंबईच्या १३ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट सुरू करण्याचे कंत्राट होते. त्यासाठी १४० कोटी रुपये देण्यात आले.

रोमिनने पैसे घेतले आणि केवळ ३८ कोटींचे प्लान्ट उभारले. तसेच १०२ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालय, बी. डी. बी. ए. रुग्णालय, जीटीबी, कस्तुरबा, नायर, कूपर, भाभा, केईएम आणि सायन रुग्णालयांत ३० दिवसांत ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. कोणताही अनुभव नसताना आणि नियमांमध्ये बसत नसताना हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप आहे.