BMC Tendernama
टेंडर न्यूज

BMC : मोठ्या पायाभूत प्रकल्पांना बूस्टर देण्यासाठी आर्थिक सर्व्हे करणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने यंदा वर्सोवा - दहिसर - मिरा भाईंदर, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, मलजल प्रक्रिया केंद्र असे मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र हजारो कोटींच्या या प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासू नये यासाठी महापालिका आर्थिक सर्वेक्षण करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिली.

मुंबईकरांसाठी सागरी किनारा रस्ता प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सागरी सेतू, वर्सोवा ते दहिसर, दहिसर ते मिरा-भाईंदर व गोरेगाव मुलुंड लिंक रोड, मलजल प्रक्रिया प्रकल्प यांसारखे मोठे पायाभूत प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी, वायू व ध्वनी प्रदूषण, इंधन वापर या समस्या दूर होऊन मुंबईकरांना अनेक फायदे होतील, या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा दर्जा राखून ते वेळेत पूर्ण करण्याकरीता मोठ्या प्रमाणात भांडवली खर्चाची आवश्यकता आहे. या प्रकल्पांसाठी भांडवली गरज लक्षात घेता आर्थिक सर्वेक्षण केले जाणार असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले.

१ एप्रिल २०१५ पासून जल देयकामध्ये मलनिःसारण आकार हे जल आकाराच्या ७० टक्के आकारण्यात येतात. मात्र मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पावरील प्रत्यक्ष वाढता खर्च भागविण्यासाठी मलनिःसारण आकारात आवश्यक सुधारणा करण्याबाबत पुनरावलोकन केले जाणार आहे. बांधिव क्षेत्रावर आकारले जाणारे अतिरिक्त मलनिःसारण आकार व जल आकार यामध्ये सुधारणा करण्यासाठी आर्थिक सर्वेक्षण देखील केले जाईल, असे यंदाच्या अर्थसंकल्पात नमूद केले आहे. अतिरिक्त ०.५० चटईक्षेत्रापोटी प्राप्त होणाऱ्या महसूलाच्या २५ टक्के ऐवजी ७५ टक्के तसेच फंजीबल चटईक्षेत्रापोटी प्राप्त होणाऱ्या महसूलाच्या ५० टक्के ऐवजी ७० टक्के हिस्सा महापालिकेस मिळणे आवश्यक आहे. याअनुषंगाने, चटईक्षेत्र अधिमूल्यापोटी अपेक्षित असलेल्या महसूलातील महापालिकेला मिळणे आवश्यक असलेला हिस्सा राज्य सरकारने विचारात घ्यावा याकरीता पत्रव्यवहार करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची आशा असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दहिसर, मानखुर्द येथे ट्रान्सपोर्ट हब -
दहिसर व मानखुर्द येथी जकात नाका बंद झाल्याने जागा ओस पडली आहे. महापालिकेचे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यासाठी दहिसर व मानखुर्द येथे ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. यातून महापालिकेला वर्षांला तीन हजार कोटींचा महसूल अपेक्षित आहे, असेही चहल यांनी यावेळी स्पष्ट केले.