Gokhale Bridge Andheri Tendernama
टेंडर न्यूज

BMCचे आता 'मिशन गोखले पूल'; 84 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल (Gokhale Bridge) वाहतुकीसाठी बंद केला आहे. या पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर केले जाणार आहे. सध्या पश्चिम रेल्वे प्रशासन हा पूल पाडण्यासाठी टेंडर (Tender) मागवणार असून, पुलाचा भाग पाडल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने ८४ कोटींची टेंडर प्रसिद्ध केली आहेत.

अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल ७ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल कोणी पाडवा यावरून महापालिका आणि रेल्वे यांच्यात वाद होता. रेल्वेला विविध परवानग्या लागणार असून त्यासाठी तीन महिन्यांहून अधिक काळ लागणार होता. यासाठी हा पूल महापालिकेने पाडावा असे रेल्वेचे म्हणणे होते. तर रेल्वेच्या हद्दीतील पूल पाडण्याचा अनुभव नसल्याचे पालिकेचे म्हणणे होते. यावर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक संपन्न झाली. यात पश्चिम रेल्वे प्रशासनाने पूल पाडण्याची तयारी दर्शवली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासन पूल पाडण्यासाठी टेंडर मागवणार असून पुलाचा भाग पाडल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ८४ कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.

अंधेरी येथील गोखले पूल पाडल्यानंतर त्या पुलाचे डिझाईन कसे असेल हे मुंबई आयआयटी ठरवणार आहे. आयआयटीने तयार केलेल्या डिझाईननुसार हा पूल बांधला जाणार आहे. हे डिझाईन पश्चिम रेल्वे प्रशासनाला ही मान्य आहे.