मुंबई (Mumbai) : मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' समजला जाणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पात (Coastal Road Project) मोठ्या प्रमाणावर आर्थिक अफरातफर झाल्याचा आरोप भाजप (BJP) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. कॅगच्या अहवालाचा दाखला देत त्यांनी महापालिका प्रशासन, सत्ताधारी शिवसेना आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आरोपांचे बाण सोडले आहेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असताना आता भाजपने सत्ताधारी शिवसेनेला आरोपीला पिंजऱ्यात उभे करण्यास सुरुवात केली आहे. आशिष शेलार यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आशिष शेलार म्हणाले, ''प्रकल्प सल्लागार असलेल्या एजन्सींना बेकायदेशीरपणे आर्थिक मदत केली जात आहे. मुंबई महापालिकेचा पैसा त्यांच्या घशात जात आहे. त्यांना अवास्तव आणि अनाकलनीय बिलाचे पैसे दिले जात आहेत. एक एप्रिल 2016 ते 31 मार्च 2020 दरम्यान झालेल्या कामावर कॅगने ठपका ठेवला असून, कोस्टल रोड प्रकल्पावर भ्रष्टाचाराचा तवंग येण्यास सुरुवात झाली आहे. कॅगने आपल्या अहवालात काही गंभीर मुद्दे उपस्थित केले असून महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.''
कोस्टल रोड प्रकल्पात 90 हेक्टर मोकळी जागा तयार होणार आहे. या मोकळ्या जागेत निवासी अथवा वाणिज्यिक बांधकाम होणार नाही अशी हमी केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने मागितली होती. त्याला, 28 महिने उलटून गेले आहेत. पालिकेने अद्याप हमीपत्र दिले नाही. महापालिकेचा काही छुपा अजेंडा आहे का? असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला आहे.
कोस्टल रोड प्रकल्पातील मोकळ्या जागेत अथवा प्रकल्प मार्गात अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण होणार नाही यासाठी नेमकी काय उपाययोजना करण्यात येणार आहेत, त्याचा आराखडाही मागितला होता. मात्र, महापालिकेने अद्यापही तो सादर केला नाही. केंद्राच्या पर्यावरण विभागाने म्हटले की, 90 हेक्टर जागेचे सुशोभीकरण करण्याची सूचना केली होती. या जागेचा फायदा मुंबईकरांना झाला असता. मात्र, 29 महिन्यानंतरही पालिकेकडून याबाबतचे नियोजन तयार नसल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.
त्याशिवाय या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कोळी व इतरांच्या पुनर्वसनाचा मुद्दा शेलार यांनी उपस्थित केला आहे. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याची सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केली होती. मात्र, मुंबई महापालिकेने अद्यापही पुनर्वसन केले नसल्याचा आरोप शेलार यांनी केला. कोस्टल रोड प्रकल्पातील मोकळ्या जागेवर काही इतर बांधकाम सुरु होणार का, महापालिकेचा काही छुपा अजेंडा आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला.