Pradad Lad Tendernama
टेंडर न्यूज

पुरे झाले 'लाड'... आता तरी पगार द्या, कर्मचाऱ्यांची आर्त हाक

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेतील सत्तेचा फायदा घेऊन, भाजप पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळून तब्बल ४२ कोटी रुपयांचा कंत्राट मिळविलेल्या भाजप जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड यांच्या कंपनीने सुरक्षा कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांपासून पगार रोखला आहे. कंत्राट मिळविण्यासाठी जुळविलेले आर्थिक गणित ऐनवेळी बिघडल्याने लाड यांच्या कंपनीने पगार देण्यापासून हात वर केल्याचे समजते. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून लाड हे उमेदवार असताना त्यांच्या कंपनीकडून हा प्रकार उघडकीस आल्याने राजकीय चर्चा रंगली आहे.

पुणे महापालिकेच्या ६०० मिळकतींच्या ठिकाणी सुरक्षारक्षक पुरविण्यासाठी प्रसाद लाड यांच्याशी संबंधित मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला तब्बल ४२ कोटी रुपयांचे काम देण्यात आले आहे. पुणे महाापलिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना एक जुलै २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२२ याकालावधीसाठी सुरक्षा कर्मचारी पुरविण्याचा करार करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला जात नसल्याच्या तक्रारी अनेकदा झाल्या. प्रशासनाने नोटीस बजावून कंपनीला बजावले, पण त्यानंतरही सुधारणा झालेली नाही. जून महिना अर्धा संपला तरी अजून एप्रिल व मे महिन्याचे वेतन दिले गेलेले नाही. त्यामुळे नोटीस बजावून ठेका रद्द करण्याची तंबीही दिली गेली आहे, तरीही पगार झालेले नाहीत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार कल्याण विभागाकडे किमान वेतन, पीएफ आणि इएसआय भरल्याची फाइल मार्च महिन्यानंतर आलेली नाही. महापालिकेने कंपनीसोबत केलेल्या करारानुसार प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पगार जमा होणे आवश्‍यक आहे. पण या करारातील अटींचे ठेकेदाराकडून उल्लंघन झालेले आहे.

इशाऱ्याचाही परिणाम नाही...

ठेकेदाराकडून एप्रिल व मे महिन्याचे वेतन दिले गेले नसल्याने ८ जून रोजी नोटीस महापालिकेकडून बजावण्यात आली आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांचे पगार, ईएसआय, पीएफ व कामगार कल्याणनिधी या रकमा संबंधित प्राधिकरणाकडे भरून त्याची चलने १४ जून पर्यंत सादर करण्याची मुदत दिली होती. ही कार्यवाही न केल्यास प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला होता. पण अद्यापही कंपनीवर कारवाई प्रस्तावित केली गेली नाही.

‘‘सुरक्षा रक्षकांना वेळेवर पगार द्यावा, यासाठी पाच ते सहा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याआधीच ठेकेदाराकडून एप्रिल व मे महिन्याचा पगार जमा होणे अपेक्षीत होते, पण आता २२ तारखेपर्यंत पगार जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंतही पगार नाही दिला तर कारवाई केली जाईल.’’

- माधव जगताप, उपायुक्त, सुरक्षा विभाग

‘‘मार्च महिन्याचे बिल दिले आहे, एप्रिल महिन्याचा पगार लगेच दिला जाईल व मे महिन्याचा पगार पुढील आठवड्यात दिला जाणार आहे.’’

- रविराज लायगुडे, महाव्यवस्थापक, पश्चिम विभाग, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि.