Chitra Wagh Tendernama
टेंडर न्यूज

टेंडरनामाची दखल; चित्रा वाघ म्हणतात, ठग्ज ऑफ बीएमसी कोण?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई : मुंबईतील २५ हजार कोटी रुपयांच्या रस्ते उभारणीतील 'कंत्राटदारां' ना लपविण्याचा मुंबई महापालिकेचा कारभार 'टेंडरनामा'ने उघडकीस आणताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने महापालिकेतील कारभाऱ्यांकडे बोट दाखवत हा रस्त्यांचा २५ हजार कोटींचा घोटाळाच असल्याचा आरोप केला. जनतेच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या 'ठग्ज ऑफ बीएमसी'ला कोण वाचवतयं ? अशा शब्दांत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर वार केला आहे.

याआधी शंभर कोटी रुपयांच्या घोटाळात गृहमंत्री गायब झाले...आता २५ हजार कोटींचा घोटाळा बाहेर आलाय...नंबर कोणाचा, असा सवालही वाघ यांनी उभा केला आहे. या प्रकरणात राजकीय आणि प्रशासकीय पत राखण्यासाठी का होईना पण रस्त्यांच्या बांधणी केलेल्या देखभालीची जबाबदारी न सांभाळलेल्या 'गबर' कंत्राटदारांची नावे महापालिकेला जाहीर करणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. राज्यभरातील विकासकामे, त्यांचा दर्जा, त्याकरिताची टेंडर प्रक्रिया, या प्रक्रियेतील गोंधळ नजर रोखून स्वच्छ आणि पारदर्शक व्यवस्थेसाठी पुढाकार घेतलेल्या 'टेंडरनामा' ने मुंबईतील रस्ते, त्यावरील खर्चाबाबतचे सविस्तर वृत्त सोमवारी प्रसिध्द केले. त्यानंतर मात्र राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

महापालिकेने मुंबईकरांसाठी बांधलेल्या रस्त्यांवर गेल्या १५ ते १८ वर्षात २२ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा तपशिल महापालिकेने मांडला; मात्र, या रक्कमेतील कामाचा तपशिल लपवून ठेवल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे रस्ते उभारणीच्या कामात आणि त्यावरच्या खर्चाच्या रकमेत नेमके कोणाचे हित साधले गेले ? याची गुंतागुंत वाढली आहे. नव्या जुन्या रस्त्यांच्या बांधणीनंतर देखभालीच्या डगडुजीच्या जबाबदारीकडे सोयीस्करने काणाडोळा करून याच रस्त्यांवर चार-सहा महिन्यांनी कोट्यवधी रुपयांची डागडुजीही दाखविण्याचे धाडस महापालिकेतील पदाधिकारी अधिकारी करीत आहेत. रस्ते चांगले आहेत. त्यावर इतका खर्चा केला जात असल्याचा दावा महापालिका करीत आहे.

शहरात वाहने आणि लोकांची वर्दळ वाढल्याने प्रमुख, जोड रस्त्यांचे जाळे विस्तारले जात आहेत. त्यात जुन्या रस्त्यांच्या देखभालीला महापालिकेचे प्राधान्य असल्याचे दिसत आहे. मुळातच, रस्त्यांच्या बांधणीची रचना, तिचे स्वरूप आणि प्रत्यक्षा कामातील साहित्य निकृष्ट वापरून वरवरची कामे केली जात असल्याचे उदाहारणे पुढे आली आहेत. पदाधिकारी अधिकारी, ठेकेदारांच्या साखळीतून हे उद्योग होत असल्याचे दिसून आले आहे.