मुंबई (Mumbai) : उल्हासनगर महापालिका संगनमत करून एकाच ठेकेदाराला कोट्यवधींचे ठेके देत असल्याने १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केला. पत्रकार परिषदेला आमदार कुमार आयलानी, भाजप नेते नरेंद्र राजांनी, प्रकाश माखिजा उपस्थित होते.
शहरात हजारो कोटींची विकास कामे सुरू असून त्यामध्ये ४२३ कोटींची भुयार गटार योजना, १२३ कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना, १५० कोटींची एमएमआरडीएचे रस्ते योजना, ४५ कोटीच्या निधीतून मूलभूत सुविधेतील विविध कामे यांच्यासह अन्य विकासकामे सुरू आहेत. याच कामाच्या टेंडरवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उल्हासनगरात एका माजी महापौरांचे नातेवाईक अरुण अशान यांनी राजकीय दबाव टाकून महापालिका प्रशासन व पी अँड झा कंपनीला हाताशी धरून मोठ्या कामाचे ठेके दिल्याचा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केला. अटीशर्तीचे उल्लंघन व खोटी कागदपत्रे जोडून त्या ठेकेदाराला कामे दिली जात आहेत. महापालिकेकडून मिळालेले कामे तो ठेकेदार लहान ठेकेदाराद्वारे करून घेत असल्याचे रामचंदानी म्हणाले. यामुळे १०० कोटीचा घोटाळा झाला असून त्याबाबतची माहिती महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यासह बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना दिल्याचे रामचंदानी म्हणाले. महापालिकेने १५ दिवसात कारवाई केली नाहीतर, भाजप आंदोलन करणार असल्याचा इशारा रामचंदानी यांनी दिली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत महापालिका आयुक्त अजीज शेख म्हणाले की, महापालिका विकास कामांसाठी टेंडर प्रक्रिया राबवते यात सहभागी कंपनीच्या कागदपत्रांची छाननी केली जाते. टेंडरमध्ये कमी किंमतीच्या ठेकेदाराला कामे दिली जातात. तर शिवसेना नेते अरुण अशान म्हणाले की, महापालिकेची कामे देतांना कोणताही राजकीय दबाव आणण्याचे कारण नाही. महापालिका टेंडर मधील अटी-शर्तीनुसार विकासकामे देते. आरोप बिनबुडाचे आहेत. पी अँड झा कंपनीचे प्रमुख प्रेम झा म्हणाले की, महापालिका टेंडर प्रक्रियेत भाग घेऊन नियमानुसार कंपनीला काम मिळाले आहे. आरोप खोटे आहेत.