Bus

 

Tendernama

टेंडर न्यूज

टेंडरविना ९०० बसेस; बेस्टचा खरा 'ड्रायव्हर' कोण?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : बेस्ट प्रशासनाने दोनशे बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठीचे टेंडर (Tender) काढून ऐनवेळी घाईगडबडीत नऊशे बसेसचा निर्णय घेतला आहे. पुन्हा टेंडर काढले तर खर्चात वाढ झाली असती अशी लोणकढी थाप मारुन सत्ताधारी विनाटेंडर निर्णयाचे समर्थन करीत आहेत. मात्र, बेस्टचा कारभार खरेच असा लोकहितवादी आणि काटकसरीचा होत असता तर आज या मंडळावर अशी वेळ आली असती का असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

तसेच ज्या कॉसिस इमोबॅलिटीकडून 700 आणि स्विच मोबॅलिटी कंपनीकडून 200 बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. दोन्ही कंपन्यांनी या डबलडेकर बससाठी बिलो टेंडर भरली होती. मात्र, याची कुठलीही शहानिशा न करताच या कंपन्यांना दोनशे ऐवजी आता थेट नऊशे बसेस पुरवठा करण्याची लॉटरी लागली आहे. त्यामुळे इतक्या घाईगडबडीत निर्णय घेण्यामागचे नेमके 'अर्थ'कारण काय असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच बेस्टचा खरा 'ड्रायव्हर' कोण आहे अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

बेस्टच्या ताफ्यात 900 इलेक्ट्रीकल वातानुकूलित डबल डेकर बस दाखल होणार आहेत. त्यापैकी 200 बसेस या वर्षभरात मुंबईत दाखल होणार आहेत. बेस्ट समितीत या प्रस्तावाला बहुमताने मंजूरी दिली आहे. मात्र, टेंडर न काढताच या बसेस भाड्याने घेण्यात येत असल्याचा आक्षेप भाजपने नोंदवला आहे.

बेस्ट भाडेतत्वावर या बसेस ताफ्यात दाखल करुन घेणार आहेत. दोन कंपन्यांकडून प्रत्येकी 200 बसेस भाड्याने घेण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीत मांडण्यात आला होता. त्यातील एका कंपनीने 1 हजार बसेस पुरविण्याची तयारी दाखवली. त्यावर शिवसेनेचे अनिल कोकीळ यांनी 900 बसेस भाड्याने घेण्याची उपसूचना मांडली आणि ही उपसूचना मंजूर करण्यात आली. मात्र, हा करार नियमबाह्य पद्धतीने होणार आहे. या 900 बसेस चालवणार कोठे या प्रश्‍नाचे उत्तर प्रशासनाकडे नाही. यासाठी टेंडर काढण्याची गरज होती. मात्र, टेंडर न काढताच हा करार करण्यात येत असल्याचा आक्षेप भाजपचे सदस्य सुनिल गणाचार्य यांनी घेतला. त्यावर भाजपकडून नाहक टीका केली जात आहे, असे प्रतिउत्तर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

दोन वर्षांपूर्वी बेस्टने सिंगल डेकर बसेस भाड्याने घेतल्या आहेत. त्या बसेसच्या प्रत्येक किलोमीटरसाठी ७४ रुपयांचा खर्च येतो. सिंगल डेकर मिनी बस ३६ आसनी आहेत. तर, या डबल डेकर बसेससाठी एक किलोमीटर मागे 56 रुपये 40 पैशांचा खर्च येणार आहे. या डबलडेकर बसची क्षमता ७८ आसनी आहे. कॉसिस इमोबॅलिटी आणि स्विच मोबॅलिटी या कंपन्यांनी या डबलडेकर बससाठी बिलो टेंडर भरले होते. मात्र, याची कुठलीही शहानिशा न करताच या कंपन्यांकडून ९०० बसेस घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे इतक्या घाईगडबडीत निर्णय घेण्यामागचे नेमके 'अर्थ'कारण काय असा सवाल उपस्थित होत आहे.

कॉसिस इमोबॅलिटी आणि स्विच मोबॅलिटी या कंपन्यांनी मिळून 400 बसेस पुरविण्याची तयारी दाखवली होती. त्यातील कॉसिस इमोबॅलिटी कंपनीने 1 हजार बसेस पुरविण्याची तयारी दाखवली होती. त्या कंपनीकडून 700 बसेस घेण्यात येतील तर स्विच मोबॅलिटी या दुसऱ्या कंपनीकडून 200 बसेस अशा 900 बसेस घेण्यात येतील. जर पुन्हा टेंडर काढले तर खर्चात वाढ झाली असती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असे बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी सांगितले. महाराष्ट्र शुद्ध हवा मोहिमेअंतर्गत इलेक्ट्रिक बसेस घेण्यासाठी 1 हजार 250 कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. त्यातून या बसेससाठी खर्च करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षात 25 टक्के बसेस दाखल होणार आहेत. त्यानंतर टप्प्या टप्प्याने बसेस वाढविण्यात येतील.