Eknath Shinde Tendernama
टेंडर न्यूज

शिंदेंचा आता थेट ठाकरेंनाच जोरका झटका; ५ हजार कोटींच्या कामांना...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आता थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनाच जोरका झटका दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांच्याकडील पर्यटन खात्याच्या सुमारे ५ हजार कोटींच्या विकासकामांना स्टे देण्यात आला आहे.

शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात येऊन आता एक महिना होत आला आह. गेल्या काही दिवसांपासून नव्या सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. विशेषतः ठाकरे सरकारच्या काळातील अनेक निर्णय फिरवणे आणि निधी वितरणाला चाप लावण्यात येत आहे. यातूनच विविध विभागांच्या कामांना स्थगिती दिली जात आहे. याआधी जिल्हा वार्षिक योजना, राज्यस्तरीय योजना, आदिवासी उपयोजना तसेच विशेष घटक योजनेच्या निधीतून होणाऱ्या कामांना स्थगिती दिली आहे. त्याशिवाय नगरविकास, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, पाणीपुरवठा, ओबीसी कल्याण, शालेय शिक्षण, आदी प्रमुख विभागांची कामे स्थगित करण्यात आली आहेत.

त्यानंतर आता पर्यटन विभागाच्या कामानांही स्थगिती देण्यात आली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी ॲडव्हेंचर टुरिझमचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणले होते. शिवाय कॅरव्हॅन धोरण आणि साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली. आघाडी सरकारच्या काळात प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत 2022-23 मध्ये आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संबंधित प्रशासकीय कामांना मान्यता देण्यात आली होती. पण नव्या सरकारने या दोन्ही कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन विभागाच्या 5 हजार कोटींच्या विकासकामांना स्थगिती देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.