Pune Ring Road

 

Tendernama

टेंडर न्यूज

पुणे वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी अधिवेशनात मोठी घोषणा...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पुणे (Pune) शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) प्रस्तावित करण्यात आलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी अर्थसंकल्पात १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी महिनाभरात टेंडर काढण्यात येणार आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

विधिमंडळ अधिवेशनातील लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, 'पुरंदर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पुणे शहरातून जाणाऱ्यांना वर्तुळाकार रस्त्याची चांगली मदत होणार असून, त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम खासगी सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर करण्यात येणार आहे. महिनाभरात निविदेचे काम होईल.'

दरम्यान, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच शहरांच्या बाहेरील विकसन केंद्रांसह (ग्रोथ सेंटर्स) एकूण २१७२ चौरस कि.मी. क्षेत्रासाठी सर्वंकष वाहतूक आराखडा अहवाल तयार करण्यात आला आहे. याच सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार भविष्यातील सर्व वाहतूक योजनांची कामे करण्यात येणार आहेत. पुण्याकडे जाताना शिक्रापूरपर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या रहदारीचा विचार करून उड्डाणपूल करण्यात येणार असून त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम सुरू आहे. ते तातडीने करण्यात येणार असल्याचेही तनपुरे यांनी सांगितले.

अर्थसंकल्पात १५०० कोटींची तरतूद करण्यात आल्याने वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनाला गती मिळाली असून येत्या जुलैपर्यंत संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले आहे. प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. प्रथम पश्चिम भागातील कामाला सुरुवात करण्यात आली आहे. भोर, हवेली, मावळ, मुळशी या चार तालुक्यांतून हा रस्ता प्रस्तावित असून संबंधित गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन खरेदीखत करण्यास सुरुवात झाली आहे.

स्वेच्छेने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना चालू बाजारमूल्यानुसार (रेडीरेकनर) पाचपट मोबदला देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन भूसंपादन करण्यात येत आहे, असे एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी सांगितले.

या गावांतून जाणार प्रकल्प

भोर - केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव, रांजे

हवेली - रहाटवडे, कल्याण, घेरासिंहगड, खासगाव मावळ, वरदाडे, मालखेड, सांडवी बुद्रूक, सांगरूण, बहुली

मुळशी - कातवडी, मारणेवाडी, आंबेगाव, उरवडे, कासार आंबोली, भरे, अंबडवेट, घोटावडे, रिंहे, केससेवाडी, पिंपलोळी

मावळ - पाचर्णे, बेंबडओहोळे, धामणे, परंदवाडी, उर्से