मुंबई (Mumbai) : मुंबईसह राज्यात महाविकास आघाडीचे नेते, खासदार, आमदार यांच्या घरांवर 'ईडी'च्या (Enforcement Directorate) धाडी पडत असल्याने सध्या राजकीय वर्तुळात ही कारवाई जोरदार चर्चेत आहे. त्यातच भाजपचे (BJP) नेते व आमदार आशिष शेलार यांनी, मुंबईतील नालेसफाईच्या कामांत 'हात की सफाई' दाखविणाऱ्या कंत्राटदारांना (Contractors) केवळ ब्लॅकलिस्ट (Blacklist) न करता त्यांना ईडीच्या दरवाजात उभे करून चांगलाच इंगा दाखविण्यात येईल, अशी सरळसरळ धमकीच दिली आहे. शेलार यांच्या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्ष पदावर कार्यरत असताना शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर काही दिवसांपूर्वीच आयकर खात्याची धाड पडली होती. त्यावेळी त्या कारवाईची पालिकेत चर्चा होती. आता भाजपचे आशिष शेलार यांनी कंत्राटदारांना ईडीचा इंगा दाखविण्याची धमकी दिल्यामुळे पालिकेतही ईडी बाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.
नालेसफाईचे प्रस्ताव स्थायी समितीच्या ७ मार्च रोजीच्या बैठकीत मंजूर न करता सत्ताधारी शिवसेनेने नालेसफाई कामांना व मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून दिले आहे, असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी बुधवारी पालिका आयुक्त इकबाल चहल यांची पालिका मुख्यालयात भेट घेऊन केला आहे.
वांद्रे ते दहिसर, कुर्ला ते मुलुंड पर्यंत भाजपच्या खासदार, आमदार व नगरसेवकांनी एक आठवडा नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी, अनेक नाले गाळाने, कचऱ्याने भरलेले, तुंबलेले आढळून आले. काही ठिकाणी तर कंत्राटदारांनी नालेसफाईच्या कामांना अद्यापही सुरुवातही केलेली नसल्याचे आढळून आले असून, एका नाल्यात तर एक कचरा वेचक व्यक्ती नाल्यातील गाळावरून चक्क चालत गेल्याचा धक्कादायक अनुभव आमदार शेलार यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितला.
मुळात नालेसफाईच्या कामांना १५ - २० दिवस उशीर झालेला असून, आतापर्यंत १० टक्केही नालेसफाई झालेली नाही, असा दावा आमदार शेलार यांनी केला आहे. तसेच, नालेसफाईच्या कामांकडे सत्ताधारी व पालिका प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्याने पावसाळा सुरू होइपर्यंत २५ टक्केही नालेसफाईची कामे होणार नसल्याचा व जर पावसाळा अगोदरच सुरू झाल्यास मुंबईची तुंबई होण्याचा इशाराही त्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
नालेसफाईची कामे पूर्ण व्हायची असतील तर कामावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची विशेष टास्क फोर्स नियुक्त करावा, अशी मागणी आमदार शेलार यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे केली आहे. तसेच, आय.ए.एस. अधिकाऱ्यांना एसी कार्यालयात बसू न देता त्यांना रस्त्यावर उतरून काम करायला लावावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी आयुक्तांकडे केली. यावेळी, टास्क फोर्सच्या मागणीवर आयुक्तांनी सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.